पुणे-पोलिस दलाच्या मोटर परिवहन विभागातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवारी) दुपारी उघडकीस आली आहे. सहाय्यक उपनिरीक्षकाच्या पत्नीचे महिन्याभरापुर्वी निधन झाले होते. त्यामुळे ते नैराश्यात होते. त्यामधूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजेश दगडू महाजन (50, रा. हरपळे वस्ती, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे.
महाजन हे पुणे शहर पोलिस दलातील मोटर परिवहन विभागात (एमटी) कार्यरत होते. पुणे शहर पोलिस दलात रूजू होण्यापुर्वी महाजन हे लष्करात होते. तेथून निवृत्त झाल्यानंतर ते पोलिस दलामध्ये रूजू झाले होते. आज (सोमवार) दुपारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्याचे त्यांच्या निकटवर्तींयांनी सांगितले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.