पुणे—राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष एकत्रपणे एकमेकांची पाठ खाजवतात ते मला खूपच आवडलेलं आहे असा उपरोधिक टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लगावला.
धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी घडवलेल्या कलाकृती महोत्सवाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोजक माजी आमदार मेधा कुलकर्णी, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आदी उपस्थित होते.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करून सांगते
अमृता फडणवीस म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकार हे खूप ‘वीक’ सरकार आहे. ते केव्हा पडेल कधी नाही याचा ध्यास सर्वांना लागला आहे. मात्र, हे सरकार पडले तर एक चांगला पर्याय देऊ असे भाजपने सांगितले आहेच. शरद पवार यांनी घेतलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या जे नेते आज दिल्लीत भेटत आहेत, ते आधीपासूनच भेटत आहेत. अचानकपणे त्यांची भेट होत नाहीये. त्यामुळे या भेटीवरून निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. ‘भाजपा चांगला पर्याय देऊ शकते असं आपण म्हणता, पण भाजपा नेमकं कुणाला सोबत घेणार?’,या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी यासंदर्भात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी बोलून तुम्हाला नक्की सांगेन अशी मिश्किल टिप्पणी केली.
राज्यपालांविषयी बोलताना त्या म्हणाल्या, राज्यपाल कोश्यारी यांच्यासारखी निष्ठावंत, कर्तृत्ववान व्यक्ती मी कधीही पाहिलेला नाही. राज्यपालांच्या दौऱ्याला जे विरोध करत आहेत, त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नाहीत, म्हणून राग आहे. पण असे व्हायला नको, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
दुसरीकडे पुणे मेट्रोच्या प्रोजेक्टवरुनही अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, अशा शब्दात त्यांनी राज्य शासनावर निशाणा साधला.
आता कोणत गाणं येणार आहे अशी विचारणा करण्यात आली असता, अमृता फडणवीस म्हणाल्या, “गणेश चतुर्थीच्या आधी माझं एक गाणं येणार आहे”. त्यानंतर त्यांना गाणं सादर करण्याचा आग्रह करण्यात आला. त्यावर अमृता फडणवीस (स्टेजकडे बोट करीत) म्हणाल्या, “मी तिथे म्हटलं असतं, इथं ही वेळ नाही.
राज्यातल्या ज्या शहरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, तिथे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. मात्र पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारने पुण्यातले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. याबाबत बोलताना अमृता फडणवीस यांनी आक्षेप घेत पुण्याबाबत सरकारने असा निर्णय का घेतला हे कळत नाही. मात्र, त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीसांनी पुणेकरांना दिला.
“हॅन्डलूम जगभरात आहे. हॅन्डलूम 125 देशात एक्स्पोर्ट होतं. शेती नंतर हातमाग हा सर्वात मोठा उद्योग आहे. 77 टक्के या कामात स्त्रिया आहेत. 7 ऑगस्ट 2015 पासून हातमागदिन साजरा केला जातो.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातमागाचं महत्व ओळखले आहे. स्वदेशी चळवळ 7 ऑगस्टला सुरु झाली होती. त्याचमुळे 7 ऑगस्ट ला हातमागदिन साजरा केला जातो. पैठणीचं कारोबारही मोठा आहे. देशातले स्त्रिया पैठणी ऐटीने घालतात. हॅन्डलूमचं क्षेत्रही चांगलं वाढत आहे. हँडलूमच्या वस्तू फक्त जपून ठेवायच्या नाहीत त्या वापऱ्यायच्या.”, असं त्या म्हणाल्या.