पुणे- आमच्या तीन पक्षाचा स्वच्छ निर्णय झाला आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंधच येत नाही. आम्हाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. त्या निर्णयावर आम्ही कायम आहोत असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी माझ्या नावाला तिन्ही पक्षांचा होकार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलं होतं. त्याबाबत विचारले असता पवार यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.
विधानसभेतील गदारोळाबाबत विचारले असता ते म्हणाले, विधानसभेत गोंधळ झाला. शिक्षा झाली. त्यावर विधानसभेने निर्णयही घेतला आहे. आता ते काय जुनं उकरून काढायचं?, असा सवाल त्यांनी केला. ज्यांनी चुकीचं काम केलं त्यांना शिक्षा करावी विधानसभेला वाटलं. त्यावर विधानसभेने निर्णयही घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
समान नागरी कायद्याबाबत केंद्र सरकार जोपर्यंत काही भूमिका घेत नाही. तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकार काय करतंय यावर आमचं लक्ष आहे, असंही ते म्हणाले.
स्वबळाच्या घोषणेबाबत बोलताना ते म्हणाले, ‘प्रत्येक पक्षाला आपली राजकीय भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्र चालवत नाही. पक्ष वेगळेच चालवतो. त्यामुळं काँग्रेसनं राजकीय भूमिका मांडली. शिवसेनेनं मांडली, आमच्या पक्षातून जयंतरावांनी मांडली. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढवायचा अधिकार आहे. त्यात चुकीचं काहीच नाही.’
नाना पटोले यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर थेट टीका केली होती. ‘पुण्याचे पालकमंत्री हे बारामतीकर आहेत. त्यांच्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची कामं केली जात नाहीत, असा आरोप पटोले यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता, ‘या गोष्टीत मी पडत नाही. नाना पटोले वगैरे ही लहान माणसं आहेत, मी त्यांच्यावर कशाला बोलू? सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी बोललो असतो,’ असं पवार म्हणाले.