पुणे- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व आणि मुख्य परीक्षा होऊन दोन वर्षे उलटल्यानंतरही नियुक्तीसाठी मुलाखत होत नाही म्हणून नैराश्याने ग्रासलेल्या पुण्यातील फुरसूंगी भागातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्याअगोदर सुसाइड नोट लिहिलेली आहे. त्यातून एमपीएससी परीक्षा देणाऱ्या आणि परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न झालेल्या तरुणांच्या प्रश्नांची दाहकता ही राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. दरम्यान, या घटनेने संतापलेल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. आपल्या राज्याचे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री साहेब तुमचा मुलगा २८ वर्षाचा आहे. तो आमदार होतो, मंत्री होतो. पण आमचं काय? असा संतप्त सवाल या विद्यार्थ्यांनी केला आहे.
शासन आणि राजकीय नेत्यांच्या इच्छा शक्तीच्या अभावामुळे स्वप्निलने आत्महत्येचं पाऊल उचललं. याला जबाबदार ही व्यवस्था असून असे स्वप्निल अभ्यासिकेत अनेक वेळा पाहायला मिळतात. हे झालं आमच्या मित्राचं, पण ज्या राज्यकर्त्यांमुळे आमच्यावर ही वेळ आली. त्यांना आमचं देणंघेणं नसून त्यांना त्यांच्या मुलांना आमदार, खासदार आणि मंत्री म्हणून सेट करायचं आहे. आपल्या राज्याचे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री साहेब तुमचा मुलगा २८ वर्षाचा आहे. तो आमदार होतो, मंत्री होतो. पण आमचं काय? मुख्यमंत्री साहेब आमच्या परीक्षा ते नियुक्त्यांबाबत निर्णय घ्या. अन्यथा शेतकरी आत्महत्यांनंतर स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांचा विस्फोट होईल, एवढंच सरकारने लक्षात ठेवावं, असा इशारा देखील या परीक्षार्थींनी दिला आहे.
मागील काही वर्षात MPSC ची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शासन आणि आयोग कोणत्याही प्रकारचे निर्णय घेत नाही. परीक्षेच्या तारखे पासून ते नियुक्त्या जाहीर करेपर्यंत आजवर गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. याचा फटका सर्व कुटुंबातील तरुणांना बसला आहे. परीक्षा देत-देत वय निघून गेलंय. कोणी लग्नासाठी मुलगी देत नाही. एवढं शिक्षण घेऊन आमच्या वाट्याला अपयश आणि नैराश्य आलं आहे. आम्ही कसं जगायचं आणि शेतात राबणाऱ्या बापाला काय उत्तर द्यायचं? असा सवाल हे परीक्षार्थी आता विचारू लागले आहेत.