पुणे- फेसबूकवर मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून हळूहळू मैत्री वाढवून आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर तरुणांना आणि पुरुषांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांना नग्न होण्यास सांगणे आणि नंतर त्यांना हा व्हिडिओ त्यांच्या फ्रेंड लिस्ट मधील मित्रांना शेअर करण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील या जाळ्यामध्ये सुमारे 150 जण अडकले आहेत. श्रीमंत कुटुंबातील मुलं, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक अशा सर्वच स्तरातील व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे.भीतीपोटी आणि बदनामी होऊ नये म्हणून अनेकांनी पैसेही देऊन टाकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनोळखी महिलांशी फेसबूकवर मैत्री करताना कितपत वाहवत जायचे याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
पोलिसांकडे अशा प्रकारची फसवणूक झाल्याच्या सुमारे 150 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. लॉकडाऊन काळात घरी असताना पुण्यातील एका तरुणाला फेसबुकवर अनोळखी मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली होती. गप्पा झाल्यानंतर थेट व्हॉट्सअॅप नंबर शेअर झाले. हळूहळू व्हिडीओ कॉलवर बोलणं होऊ लागलं. नंतरच्या काळात त्या मैत्रिणीने त्याला नग्न होण्यास सांगितलं. यानेही प्रतिसाद दिला. नंतर थेट तोच व्हिडीओ तरुणाच्या व्हॉट्सअॅपला येऊन धडकला आणि पैशांची मागणी होऊ लागली.
पैसे देण्यास नकार दिल्यास तुझ्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या प्रत्येकाला हा व्हिडीओ शेअर करण्याची धमकीही देण्यात आली. हे फक्त एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. पुण्यात 150 हून अधिक जणांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. यामध्ये श्रीमंत कुटुंबातील मुलं, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक अशा सर्वच स्तरातील व्यक्तींचा समावेश आहे. भीती आणि बदनामीमुळे अनेक जण पैसे देऊन मोकळे झाले. पुणे सायबर पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलीस दोन आरोपींच्या मागावर असून लॉकडाऊन संपताच दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान येथे कारवाईसाठी जाणार आहेत.