पुणे- पुणे महापालिकेच्या क्षेत्रासह मुंबई महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 26 जुलैपासून विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी तात्पुरते प्रारुप Mock.Demo.Registration या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहे. केवळ सरावासाठी 16 जुलैपासून ते 24 जुलैपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया चालेल. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नंतर नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी याबाबत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांना आदेश दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीचे निकाल रखडले असले, तरी अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे