मुंबई – सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. लॉकडाऊननंतर लग्नासंबंधीच्या अटी शिथिल केल्यानंतर आता काहीजण पुन्हा लग्न धूमधडाक्यात करू लागले आहेत. अनेक वेळेला लग्नाच्या निमित्ताने हौशी लोकांचे अनेक किस्से आपण ऐकत अथवा पाहत असतो. परंतु, सध्या एक लग्नपत्रिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून ही लग्नपत्रिका चर्चेचा आणि टीकेचाही विषय ठरली आहे. ही घटना चंद्रपूरची असल्याचे बोलले जात आहे.
जी लग्नपत्रिका व्हायरल होत आहे तिच्या पहिल्या पानावर श्री गणेशाचा फोटो छापण्यात आला आहे. त्यानंतरच्या पृष्ठामध्ये लग्नाची तारीख आणि कार्यक्रम तपशीलवार दिले आहेत. मात्र, त्यानंतरचे पृष्ठ पाहून प्रथम लोकांना आश्चर्य वाटले आणि तो चर्चेचा विषय झाला. कारण या पानांच्या खालून चक्क मद्याची बाटली आणि चकना बाहेर आला. मिनरल वॉटरची बाटलीही त्यासोबत ठेवली होती.
वास्तविक चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी लागू आहे. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दारू बंदीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेवर लोक विविध टिप्पण्या करत आहेत. अनेकजण म्हणतात की जिल्ह्यात दारू बंदी असूनही अशी लग्नपत्रिका छापणे योग्य नाही.
दरम्यान, या लग्नपत्रिकेची ज्या व्यक्तीने छपाई केली आहे त्याने ही पत्रिका त्याच्या मुलाच्या लग्नाची असल्याचे कबुल केले आहे. हे लग्न चंद्रपूरच्या एका हॉटेलमध्ये झाले आहे, परंतु चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याने ही लग्नपत्रिका चंद्रपूर जिल्ह्यात वाटली नाही तर नागपूर व विविध जिल्ह्यातील काही विशिष्ट नातेवाईकांना देण्यात आली आणि चंद्रपूरमध्ये वितरीत केलेल्या लग्नपत्रिकेत ड्रायफ्रूट्स देण्यात आल्याचे लग्नपत्रिकेची छपाई केलेल्या व्यक्तीने सांगितले.