पुणे –कोरोना संसर्गाच्या गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाईल’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात असताना उद्याने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या सूचना महापौर मोहोळ यांनी दिल्या आहेत. कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी अटी आणि शर्थीच्या आधारावर उद्याने खुली केली जाणार आहेत.
याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत पुणेकरांनी महापालिका प्रशासनाला उत्तम सहकार्य केले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे. त्यामुळे काही नियम घालून उद्याने सुरु करण्याचा निर्णय आपण घेत आहोत. ते नियम तंतोतंत पाळणे आवश्यक आहे’.
‘केंद्रीय पथकाने शहरातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उद्यानात वावरताना पुणेकरांनी योग्यप्रकारे आपली काळजी घ्यावी. काळजी उत्तम प्रकारे घेतल्यास आपल्याला कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात सहज यश मिळू शकते’, असेही महापौर म्हणाले.