पुणे – देशात शब्द आणि संकल्पना मांडल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे लेखणी सत्ताधाऱ्यांच्या तलवारी बरोबर कशी लढू शकते असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी केली आहे.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या फेस्टिवल निमित्त आयोजित कार्यक्रमात शशी थरूर बोलत होते.
शशी थरूर म्हणाले, मी शाळेत असताना लेखणीची धार तलवारीपेक्षा अधिक असते, असं शिकलो होतो. मात्र, देशातील सध्याची परिस्थिती बघता यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण वरावरा राव, आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज आणि वर्णन गोन्साल्विस यांच्यासारख्या कार्यकर्त्यांवर त्यांनी व्यक्त केलेल्या शब्द आणि विचारांमुळे सरकारने कारवाई केली आहे, असेही ते म्हणाले.
जानेवारी २०१८ला पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव मध्ये हिंसाचार उसळला होता. त्यापूर्वी एक दिवस पुण्यातल्या शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात या हिंसेचं मूळ आहे असा पुणे पोलिसांचा आरोप आहे. पुणे पोलिसांनी गौतम नवलाखा, सुधा भारतद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्नोन गोन्साल्विस यांना अटक केली होती.. त्यानंतर इतरांनाही अटक करण्यात आली.
इतर संघटनांना पुढे करुन एल्गार परिषद ही केवळ चेहरा होती त्यामागून हे माओवादी कार्यकर्ते त्यांच्या विचारसरणीचा प्रचार करत होते असाही आरोप आहे. एल्गार परिषदेत सुधीर ढवळे आणि कबीर कलामांचच्या इतर सदस्यांनी आक्षेपार्ह गाणी सादर केली होती. समाजात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्यं करुन पत्रकं आणि पुस्तिका वितरित केल्या असंही पुणे पोलिसांचे म्हणणे आहे.