जनसेवा सहकारी बँकेचा ५४ वा वर्धापनदिन : ‘वृक्षदाई प्रतिष्ठान’ला मानाचा ‘जनसेवा पुरस्कार २०२६’ जाहीर

जनसेवा पुरस्कार २०२६
जनसेवा पुरस्कार २०२६

पुणे(प्रतिनिधी)–हडपसर येथील अग्रगण्य व पुणे जिल्ह्यातील नॉन शेडूयल बँकांमध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या ‘जनसेवा सहकारी बँकच्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा प्रतिष्ठित ‘जनसेवा पुरस्कार २०२६’ पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी समर्पित असलेल्या “वृक्षदाई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू” या उल्लेखनीय संस्थेस जाहीर झाला आहे. शनिवार दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता हडपसर येथील विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहामध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

रुपये १,०१,०००/- धनादेश, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.  खासदार श्री. मुरलीधर मोहोळ (केंद्रीय राज्यमंत्री, सहकार व नागरी विमान वाहतूक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. श्री. नंदकुमार मुलमुले हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना “सुखाचा शोध” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ, संचालक राजेंद्र वालेकर, सचिन शिरुडे, राजन वडके आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष पोळेकर यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अधिक वाचा  पुणे: पेपरफुटीविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी'चे सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य आंदोलन, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ म्हणाले,  सन १९७२ मध्ये हडपसर परिसरातील समविचारी कार्यकर्ते (कै. मामासाहेब हजारे, कै. आबनावे गुरुजी, कै. रघुनाथ कचरे, कै. मधुकरराव टेमगिरे आणि कै. रामचंद्र मारुती रासकर) यांनी सामाजिक जाणीवतून एका भिशी मंडळाची स्थापना केली होती. पुढे याच व्यवहारांतून स्वतंत्र बँकेची गरज भासल्याने १९७२ साली ‘जनसेवा सहकारी बँक’ अस्तित्वात आली. “बहुत जनांसी आधारू” हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणत बँकेने ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक सहाय्य व सामाजिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचे मोलाचे कार्य केले आहे.

आज बँकेचा एकूण व्यवसाय ३,२४०.२५ कोटी रुपयांचा असून, ३१ मार्च २०२६ अखेर बँकेकडे २,०८१.३८ कोटी रुपयांच्या ठेवी आणि १,१५८.८७ कोटी रुपयांची कर्जे जमा आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा, सातारा आणि ठाणे असा एकूण २८ शाखांचा विस्तार असलेली ही बँक ग्राहकांना मोबाईल बँकिंग, युपीआय (UPI), इंटरनेट बँकिंग, तसेच २२ एटीएम आणि रुपे प्लॅटिनम कॉन्टॅक्टलेस कार्ड्स यांसारख्या अत्याधुनिक डिजिटल सेवा अत्यंत यशस्वीपणे पुरवत आहे.

अधिक वाचा  विद्यानंद बापटांवर पुण्यात थेट कॅमेऱ्यासमोर हल्ला; डीजे विरोधातील भूमिकेवरून वाद, आरोपी अटकेत

फक्त व्यावसायिक प्रगती न करता, जनसेवा बँकेने नेहमीच सामाजिक उत्तरदायित्व उत्तमरीत्या पार पाडले आहे. सासवड जवळील एखतपूर गावाचा सर्वांगीण विकास आणि पुरंदर तालुक्यातील खळद गावाच्या पाणीपुरवठा योजनेला भरघोस आर्थिक सहाय्य करून पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला आहे. तसेच, दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी पेयपानाची व्यवस्था केली जाते आणि महिला वर्गासाठी मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले जाते.

बँकेने वर्धापनदिनानिमित्त यापूर्वीही अनेक सामाजिक संस्थांचा गौरव केला आहे. यामध्ये सन २०२० चा पुरस्कार ‘अस्तित्व प्रतिष्ठान, वीर’, सन २०२१ चा पुरस्कार ‘तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास, वेल्हे’, सन २०२२ चा पुरस्कार ‘पूर्णम इको व्हिजन फाऊंडेशन, पुणे’ व ‘वनप्रस्थ फाऊंडेशन, सिन्नर’, सन २०२४ चा पुरस्कार ‘निरामय सिंहगड रोड, पुणे’ आणि सन २०२५ चा पुरस्कार ‘कॉक्लिआ पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच, पुणे’ या संस्थांना प्रदान करण्यात आला आहे. या भव्य वर्धापनदिन सोहळ्यास सर्व सभासद, ग्राहक व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जनसेवा सहकारी बँकेच्या संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love