पुणे गणेशोत्सवात डीजेसाठी ‘चार बेस, चार टॉप’ची मर्यादा; पोलिस आयुक्तांचे स्पष्ट निर्देश

पुणे पोलिस आयुक्त गणेशोत्सव नियम
पुणे पोलिस आयुक्त गणेशोत्सव नियम

पुणे(प्रतिनिधी) – गणेशोत्सवात ‘चार बेस, चार टॉप’च्या पुढे ध्वनिक्षेपकाची संख्या वाढविल्यास आवाजाची निर्धारित डेसिबल मर्यादा ओलांडली जाते. त्यामुळे अशा ध्वनियंत्रणांना परवानगी देणे संयुक्तिक ठरणार नाही. प्रेशर मीड, प्लाझ्मा आणि लेझर लाईट याला बंदी असून गणेश मंडळांनी चार बेस आणि चार टॉपच नियंत्रणात वाजवावेत, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले. गणेश कला क्रिडा मंच येथे आयोजीत दहीहंडी व गणेशोत्‍स मंडळांच्या समन्वय बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

अमितेश कुमार म्‍हणाले, गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिस दल गणेश भक्तांच्या सोबत ठामपणे उभे आहे. मंडळांनी पोलिस दलावर यापूर्वी दाखविलेला विश्वास पुढेही कायम राहील, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. उत्सव काळात पोलिस अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि मेहनतीने काम करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. डीजेची संख्या वाढवून आवाजाची मर्यादा ओलांडत असल्यास नियमांचे उल्लंघन होते. चार बेस व चार टॉपच्या मर्यादेत ध्वनी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. नियमांचे पालन न झाल्यास पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करावी लागेल; मात्र पोलिसांना गुन्हे दाखल करण्याची मानसिकता नसून समन्वयाने उत्सव पार पाडण्याला प्राधान्य असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  मद्यधुंद डंपर चालकाने पदपाथवर झोपलेल्या मजूर कुटुंबातील नऊ जणांना चिरडले : तीनजण ठार; सहा जखमी

मंडळांशी थेट संपर्क

गणेश मंडळांच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या सूचना पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. वाहतूक, गर्दीचे व्यवस्थापन, महिला सुरक्षा आणि अन्य स्थानिक समस्या प्रत्यक्ष पाहून त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

परवानगीची प्रक्रिया वेगाने

गणेश मंडळांना परवानगी मिळण्यास विलंब होऊ नये, यासाठी मागील परवानग्या ग्राह्य धरून आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचेही  आयुक्‍तांनी सांगताना साउंडसाठी दोन दिवसाच्‍या वेगवेगळ्या परवानगीची गरज नसल्‍याचेही आयुक्‍त म्‍हणाले. गणेशोत्सव आणि दहीहंडीमध्ये लेझर लाईटचा वापर करू नये असेही अवाहन त्‍यांनी केले.

अश्लील कार्यक्रमांना परवानगी नाही

दहीहंडी किंवा अन्य उत्सवांमध्ये अश्लील कार्यक्रम आयोजित करू नयेत. अशा कार्यक्रमांसाठी आधीच पैसे देऊन नंतर पोलिसांकडे परवानगी मागण्याची वेळ येऊ नये, असा इशारा देण्यात आला.

अधिक वाचा  केस वाळवण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेली आणि पाय घसरून चौथ्या मजल्यावरून पडली : नशीब बलवत्तर म्हणून वाचली

मिरवणुकीतील गर्दीचे नियोजन

लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, अलका टॉकीज परिसरातील विसर्जन मिरवणुकीसाठी गर्दीचे व्यवस्थापन आणि वाहतुकीचे नियोजन करण्यावर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. मेट्रोमुळे पेठ परिसरातील गर्दी वाढत असल्याने त्याचाही विचार नियोजनात केला जाणार आहे.

 सोशल मीडियावर मर्यादा पाळा

सोशल मीडियावर कोणत्याही विषयावर मर्यादा सोडून वक्तव्य करू नये. आक्षेपार्ह किंवा बेताल वक्तव्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कायद्याची मर्यादा ओलांडल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी संयम राखावा आणि कोणत्याही प्रकारची हिंसक प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन आयुक्तांनी केले.

 वाहतूक, प्रकाशव्यवस्था व रस्त्यांकडे लक्ष

गणेश मंडळांच्या परिसरातील रस्त्यांची स्थिती, प्रकाशव्यवस्था आणि वाहतुकीच्या अडचणींबाबत पोलिसांनी महापालिकेशी समन्वय साधून प्रश्न सोडवावेत, असे निर्देश देण्यात आले. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त प्रकाशव्यवस्था करण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव पाठविण्याचेही सांगण्यात आले.

ड्रग्जविरोधी’ अभियानात सहभागाचे आवाहन

गणेश मंडळांनी अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीत पुढाकार घ्यावा. गणेशोत्सवानंतरही परिसरात अमली पदार्थांना थारा मिळणार नाही, अशी भूमिका मंडळांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

अधिक वाचा  '#टाटा मोटर्स’च्या वतीने पुणे येथे RED #DARK श्रेणीसह बीएस6 फेज II सादर  

 शहीद तुकाराम ओंबळे कुटुंबीयांचा सत्कार

दहीहंडी उत्सवानिमित्त शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पोलिस दल आणि नागरिकांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

काय आहे बेस आणि टॉप

बेस :बेस म्हणजे साउंड सिस्टीममधून येणारा जड आणि धडधडणारा आवाज. ढोल, ताशा किंवा गाण्यातील खालच्या पट्टीचा आवाज बेसमधून येतो. मोठा बेस स्पीकर जास्त हवा हलवतो, त्यामुळे आवाजासोबत कंपनेही जाणवतात. साउंड सिस्टीममध्ये बेसचा वापर प्रामुख्याने जड आवाजासाठी केला जातो.

टॉप :टॉप म्हणजे साउंड सिस्टीममधून आवाज स्पष्ट ऐकवणारा स्पीकर. गायकाचा आवाज, गाण्याचे शब्द, भाषण आणि वाद्यांमधील बारीक आवाज टॉपमधून ऐकू येतात. टॉपमध्ये मध्यम आणि तीव्र आवाज तयार होतो. त्यामुळे गाणे किंवा भाषण दूरपर्यंत स्पष्टपणे ऐकवण्यासाठी टॉपचा उपयोग केला जातो.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love