विद्यानंद बापटांवर पुण्यात थेट कॅमेऱ्यासमोर हल्ला; डीजे विरोधातील भूमिकेवरून वाद, आरोपी अटकेत

विद्यानंद बापट हल्ला पुणे
विद्यानंद बापट हल्ला पुणे

पुणे(प्रतिनिधी)–पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या डीजे आणि लाऊडस्पीकरच्या अमर्याद वापराबाबत सातत्याने कायदेशीर आणि सामाजिक आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी सकाळी टिळक रोड परिसरात एका तरुणाने थेट प्रक्षेपण सुरू असतानाच हल्ला केला.   माध्यमांशी बापट संवाद साधत असताना हा प्रकार घडला. या घटनेनंतर पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे हलवून आरोपी संतोष चव्हाण याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

थेट कॅमेऱ्यासमोर थरार; बापटांच्या कानशिलात लगावली

सार्वजनिक उत्सवांमध्ये आवाजाची मर्यादा पाळली जावी आणि डीजे-लाऊडस्पीकरच्या वापरावर नियंत्रण असावे, अशी ठाम भूमिका विद्यानंद बापट मांडत आहेत. याच मुद्द्यावर गुरुवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत असताना, संतोष चव्हाण नावाचा तरुण तिथे आला. त्याने “तुला यावर आक्षेप घ्यायला कोणी सांगितलं?” असा वाद घालत थेट बापट यांच्याशी हुज्जत सुरू केली. त्यानंतर “मला याला आणखी दोन मारू द्या,” असे कॅमेऱ्यासमोरच ओरडत त्याने थेट बापट यांच्या कानशिलात लगावली आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे थेट प्रक्षेपणात मोठा गोंधळ उडाला.

कोथरूडचा बांधकाम मजूर आणि माजी मंडळ अध्यक्ष निघाला हल्लेखोर

पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी संतोष चव्हाण हा पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी आहे. तो स्थानिक बांधकाम व्यावसायिकाकडे काम करतो. विशेष म्हणजे, तो राऊतवाडी येथील ‘प्रियदर्शनी गणेश मंडळा’चा माजी अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. बापट यांनी घेतलेल्या डीजे विरोधी भूमिकेवर प्रचंड चिडून जाऊन त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

अधिक वाचा  ‘आपला आवाज आमचं काळीज चिरत गेला’: प्रदीप भिडे यांच्या या वृत्तनिवेदनाला मिळाली होती दाद ..

अटकेनंतरही आरोपीचा पोलिसांसमोर उद्दामपणा!

पोलीस कोठडीत असतानाही आरोपी संतोष चव्हाणच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा कोणताही भाव नव्हता. माध्यमांशी बोलताना तो अत्यंत उद्धटपणे म्हणाला, “तो (बापट) सातत्याने टीका करतो, त्याला आणखी मारायला पाहिजे. पुणे शहरातील गणेशोत्सवाबाबत जो कोणी बोलेल, त्याच्या अशाच कानाखाली मारणार”, असा उद्दामपणा समोर आला आहे.

हल्लेखोराचा जुना व्हिडिओ व्हायरल; मांडला होता ‘आर्थिक गणिताचा’ युक्तिवाद

हल्ल्याच्या घटनेनंतर संतोष चव्हाणचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने थेट विद्यानंद बापट यांचे नाव घेऊन गणेशोत्सवाच्या अर्थकारणावर भाष्य केले होते. चव्हाणने व्हिडिओत म्हटले होते की, “आवाजाची मर्यादा पाळल्यास साऊंड सिस्टीमचा त्रास होणार नाही. पुण्यात सुमारे ३,८०० ते ४,००० छोटे-मोठे आणि १४०० नोंदणीकृत गणेश मंडळ आहेत. जर तुम्ही ७०० मंडळांचे साऊंड बंद करायला सांगत असाल, तर तुम्ही ८ हजार घरांमधील चूल बंद करायला सांगत आहात”.

 

त्याने पुढे युक्तिवाद केला होता की, गणेशोत्सवामुळे लाईट, जनरेटर, ट्रॅक्टर-ट्रॉली, हमाल, ऑपरेटर आणि सजावट करणाऱ्या हजारो स्थानिक कुटुंबांचे पोट चालते. पुण्यात या १२ दिवसांच्या काळात मंडळांचा खर्च १०० कोटींपेक्षा जास्त असतो, तर घरगुती गणेशोत्सव मिळून हा आर्थिक उलाढालीचा आकडा हजार कोटींच्या घरात जातो. “उत्सव आला की काही पर्यावरणवादी जागे होतात आणि ज्ञान देऊ लागतात” असा थेट आरोप त्याने केला होता. तसेच, निवडणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांचा प्रचारासाठी वापर करणारे १ खासदार, ८ आमदार आणि १६५ नगरसेवक उत्सवाच्या काळात मंडळांच्या बाजूने ठामपणे उभे राहत नाहीत, अशी खंतही त्याने या व्हिडिओत व्यक्त केली होती.

अधिक वाचा  प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा -- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती व इतर संघटनांची मागणी

सवंग प्रसिद्धीसाठी वेड्या माणसाचा प्रयत्न’ : विद्यानंद बापट

या निंदनीय हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना विद्यानंद बापट यांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “केवळ सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका वेड्या माणसाने माझ्यावर हात उचलला, त्याला केवळ प्रसिद्धीच्या झोतात यायचे होते”.

दुसरीकडे, पुणे पोलिसांच्या परिमंडळ १ चे उपायुक्त कृषिकेश रावले यांनी सांगितले की, “बापट यांना तात्काळ सुरक्षित जागी हलवण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हा हल्ला केवळ त्यांच्या गणेशोत्सवातील साऊंड सिस्टीमच्या भूमिकेमुळे झाला की त्यामागे काही वैयक्तिक जुना वाद आहे, याचा तपास पोलीस करत आहेत”.

राजकीय वर्तुळातून संताप; मुख्यमंत्र्यांकडून निषेध, रोहित पवारांची पोलीस संरक्षणाची मागणी

या हिंसक घटनेचे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आरोपीला ‘गावगुंड’ असे संबोधले आहे. रोहित पवार म्हणाले की, “बापट यांच्या भूमिकेला वैचारिक पद्धतीने विरोध करण्याऐवजी थेट हल्ला करणे हे एका पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. महाराष्ट्रात अशी गुंडगिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. पोलीस प्रशासनाने या हल्लेखोरांवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि विद्यानंद बापट यांना तातडीने सुरक्षा पुरवावी”.

मतभेद असू शकतात, मात्र हिंसेचं समर्थन नाहीच – मुरलीधर मोहोळ

पुण्यात डीजेच्या आवाजाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एखाद्या विषयावर वेगवेगळी मतं असू शकतात. एकमेकांची भूमिका पटत नसेल तर त्याला उत्तर संवादातून आणि वैचारिक भूमिकेतून देता येते. मात्र विचार मांडणाऱ्या व्यक्तीवर हात उचलणे, हा कोणत्याही परिस्थितीत योग्य मार्ग नाही.

अधिक वाचा  राज ठाकरे यांचा घणाघात : "जिथे जमीन भुसभुशीत तिथेच घुशी शिरतात" :

 

या प्रकरणात कडक कारवाईसंदर्भात माझं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणेही झाले असून संबंधित व्यक्तीला अटक करत अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बापट यांना पोलीस संरक्षण देण्याचे निर्देशही दिले आहेत,अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

भाजप बापट यांच्या पाठीशी- गणेश बिडकर

या गंभीर घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे पुणे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर यांनी विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ मैदानात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच त्यांनी  तात्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. भाजप बापट यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची ग्वाही दिली.

बीडकर यांनी जाहीर केले की, ते स्वतः विद्यानंद बापट यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहणार आहे. ही मारहाण एका सामान्य पुणेकराच्या मनातील भावनेच्या आणि संस्कृतीच्या विरोधात असल्याचे सांगत त्यांनी बापट यांना भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

“ही घटना पुण्याच्या सुसंस्कृत परंपरेला अजिबात शोभणारी नाही. पुण्याचा कोणताही खरा गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता कधीही असे हिंसक कृत्य करणार नाही. कोणीतरी अत्यंत भ्याड वृत्तीने हे कृत्य करून पुण्याच्या गणेशोत्सव मंडळांच्या हजारो प्रामाणिक कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे काम केले आहे,” असा  आरोप त्यांनी केला

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love