पुणे(प्रतिनिधी)–काँग्रेस पक्षाने भूतकाळात आणीबाणीच्या काळात संविधानाची मोडतोड करून मूलभूत अधिकार संपवले होते, आणि आज तोच काँग्रेस पक्ष ‘लाल संविधान’ हातात घेऊन राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केला. हे लाल संविधान जरी बाहेरून संविधानाचे कव्हर असलेले दिसत असले, तरी त्याच्या आतमध्ये माओवादाचे लाल पुस्तक दडलेले असून, त्याच विचारसरणीच्या आधारावर सध्याची त्यांची कारवाई सुरू आहे. आणि म्हणून आता ‘छात्रों की गूंज’ राहुल गांधींना आठवायला लागली आहे. मात्र, ही ‘छात्रों की गूंज’ नाहीये, ही ‘झूठ की गूंज’ आहे, अशी टीका फडणवीस यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केली.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीच्या समारोप प्रसंगी फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणालें,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अंतिम भाषणामध्ये जे अराजकतेचे काव्य आपल्याला समजावून सांगितले होते– आज तेच अराजकतेचे काव्य त्याच संविधानाचे नाव घेऊन आपल्याविरुद्ध वापरण्याचा प्रयत्न आहे. अनेकांना वाटत असेल केवळ भाजपच्या विरुद्ध वापरला जातोय, पण नाही; हे भाजपच्या विरुद्ध नाहीये, बृहद समाजाच्या विरुद्ध याचा वापर चाललेला आहे. नाव संविधानाचे घ्यायचे आणि संविधानाचे मूल्य पायदळी तुडवून अराजकतेचे काव्य या ठिकाणी मांडण्याचे काम चाललेले आहे. पण मला विश्वास आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे संविधान आपल्याला दिले आहे की, कोणी जर त्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे हात जळाल्याशिवाय राहणार नाहीत, हा मला विश्वास आहे.
ते पुढे म्हणाले, ही लढाई एक वेगळ्या पद्धतीची लढाई आहे. ज्यांनी सर्वात जास्त या संपूर्ण संविधानाची मोडतोड केली, ज्यांनी १९७५ साली बाबासाहेबांना सर्वात प्रिय असलेले संविधानातले मूलभूत अधिकार संविधान दुरुस्ती करून ‘हे मूलभूत अधिकार राहणार नाहीत’ अशा पद्धतीचे संविधान संशोधन केले आणि त्याकरता कोर्टातही जाता येणार नाही अशा प्रकारची तरतूद केली, मूलभूत अधिकार संपवून टाकले, तीच काँग्रेस पार्टी आता एक लाल संविधान घेऊन आपल्याला पाहायला मिळते आहे. हे लाल संविधान त्यांच्या हातात जे आहे, ते कव्हर संविधानाचे आहे, पण आतमध्ये माओवादाचे लाल पुस्तक आहे. त्या लाल पुस्तकाच्या आधारावर यांची कारवाई चाललेली आहे. आणि म्हणून ‘छात्रों की गूंज’ आता ‘छात्रों की गूंज’ ही राहुल गांधींना आठवायला लागली. ही ‘छात्रों की गूंज’ नाहीये, ही ‘झूठ की गूंज’ आहे, खोट्याचे या ठिकाणी नाटक चाललेले आहे.
आमच्या मुलींना सांगितले जाते की तुमच्या कुटुंबाच्या विरुद्ध बंड करा. त्यांना सांगितले जाते की भारत देश हा पितृसत्ताक आहे, या ठिकाणी महिलांना जागा नाही. पण खरं तर मला आपल्याला सांगायचं आहे, ही जी जनरेशन आहे ना, कोणी त्याला ‘जेनझी’ म्हणतं, त्याच्यानंतर ‘अल्फा’ आहे, मग ‘बीटा’ आहे… मी त्यांना ‘जेनझी’ म्हणत नाही, मी त्यांना ‘युवाशक्ती’ मानतो. ही युवाशक्ती फार हुशार आहे. राहुल गांधींच्या भाषणानंतर कर्नाटकमध्ये त्यांनी ‘छात्रों की गूंज’ येथे भाषण केलं आणि एक युवा मुलगी जी त्या कार्यक्रमात हजर होती, ती लगेच घरी गेली आणि तिने फॅक्ट चेक केलं. राहुल गांधींनी मांडलेल्या ४० मुद्द्यांपैकी २९ मुद्दे हे कसे खोटे आहेत, या संदर्भात तिने लगेच एक वेबसाईट तयार केली, त्याला ‘झूठ की गूंज’ नाव दिलं आणि त्या वेबसाईटवर पुराव्यासहित टाकलं. आता मुलींकरता, महिलांकरता बोलणाऱ्या राहुल गांधींच्या सरकारने काय करावं? तिने फॅक्ट चेक करून राहुल गांधी काय खोटं बोलले आहेत हे जसे वेबसाईटवर टाकलं, कर्नाटक सरकारने तिच्या विरुद्ध एफआयआर दाखल केला! म्हणजे यांची नियत बघा.
आज खऱ्या अर्थाने मातृसत्तेचे प्रतीक काय आहे? या देशामध्ये मातृसत्तेचे सर्वात मोठे प्रतीक काही असेल तर ते ‘वंदे मातरम’ हे गीत आहे. ‘वंदे मातरम’ पेक्षा मातृसत्ता पद्धतीचे दुसरे कुठले प्रतीक नाही. ‘त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी’ हे सुरू झाल्याबरोबर सोनियाजींनी थयथयाट चालू केला आणि वंदे मातरम गीत थांबवायला लावलं काँग्रेसच्या कार्यालयामध्ये, हे आपण सगळ्यांनी बघितलं. हे तेच वंदे मातरम गीत आहे, ज्या गीताला गात-गात अनेक स्वातंत्र्यसंग्राम सेनानी फाशीवर गेले आणि गळ्यात फास असताना देखील घाबरले नाहीत, वंदे मातरम म्हणत राहिले. पण या देशाला पितृसत्ताक म्हणणाऱ्यांना, ज्या क्षणी आम्ही ‘त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी’ म्हणतो, ‘कमला कमलदलविहारिणी’ म्हणतो, त्या क्षणी यांना काटे टोचतात असा टोला फडणवीस यांनी लगावला.
तर प्रियंकाजींना संधी तुम्ही का दिली नाही?
जर खऱ्या अर्थाने महिलांना संधी देण्याची वेळ होती, तर प्रियंकाजींना संधी तुम्ही का दिली नाही? हे राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्रींना देखील त्या ठिकाणी सांगावे लागेल असे म्हणत, ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने राजीव गांधींच्या काळामध्ये मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार आहे आणि त्यांना अशा पद्धतीने तलाक देता येणार नाही हा निर्णय दिला, तेव्हा संसदेमध्ये कायदा आणून सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलवण्याचं काम याच काँग्रेस पार्टीने केलं होतं! त्यावेळी महिला कुठे होत्या? त्यावेळी मातृसत्ता कुठे होती? जर तुम्हाला हिमाचलच्या मंत्रिमंडळामध्ये, कर्नाटकच्या मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी एकही महिला मिळत नाही आणि इथे येऊन महिलांच्या संदर्भात तुम्ही वक्तव्य करता हा सर्व दुटप्पीपणा आहे असे ते म्हणाले.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि विरोधकांवर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले, २०२३ मध्ये संसदेत महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ३३ टक्के आरक्षण देणारे बिल आणले गेले होते, ज्यामध्ये जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना या दोन अटींवर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यावेळी एनडीएजवळ बहुमतामुळे बिल पास होणार हे निश्चित असल्याने, काँग्रेसने ‘बहती गंगा में हाथ धो लो’ या न्यायाने त्याला मतदान केले होते. परंतु, कोविडमुळे जनगणना २०२८ च्या आधी मिळणे अशक्य झाल्याने, २०२९ च्या निवडणुकीत महिलांना आरक्षण देता यावे म्हणून सरकारने केवळ जुन्या जनगणनेचा आधार घेण्याची सोपी तरतूद करणारे सुधारित विधेयक आणले.
या नवीन विधेयकावर आता एनडीएजवळ दोन-तृतीयांश बहुमत नाही हे पाहून, काँग्रेस आणि यूपीएच्या मित्रपक्षांनी लगेच महिला आरक्षणाच्या विरोधात मतदान करत बिल पाडले. जर २०२३ ला या बिलाचे समर्थन केले होते, तर आज त्याला विरोध का? असा सवाल उपस्थित करून, महिला आरक्षणाचे खरे मारेकरी राहुल गांधी आणि त्यांचे युतीमधील पक्षच असल्याचा घणाघात त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा जे ठरवले ते पूर्ण करून दाखवण्याची त्यांची परंपरा असून, आगामी २०२९ च्या निवडणुकीमध्ये सर्व अडचणी पार करून महिला आरक्षण आणल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात या भारताची जी घोडदौड चाललेली आहे, जगातली चौथी अर्थव्यवस्था म्हणून भारत तयार झाला आहे, आत्मनिर्भरतेकडे चालला आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीने या भारताला शस्त्रास्त्रांकरता कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. आपले अवलंबत्व आता काही प्रमाणात पेट्रोल-डिझेलकरता आहे; पण मला विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वात २०३० पर्यंत आमच्या पेट्रोल-डिझेलची ५०% गरज आमचा शेतकरी त्या ठिकाणी भागवेल आणि उरलेली जी गरज आहे, त्यापैकी एक मोठी गरज ईव्हीच्या माध्यमातून भागवली जाईल. आणि म्हणून भारत आत्मनिर्भरतेकडे चालला आहे. आत्मनिर्भरतेकडे जाणारा भारत तुम्हाला आणि आम्हाला आवडत असेल, पण जगामध्ये अशा खूप शक्ती आहेत ज्या शक्तींना हे चालत नाहीये, आवडत नाहीये, पाहवत नाहीये. त्या शक्तींना माहिती आहे की या भारताला याच ठिकाणी जर रोखलं नाही, तर या भारताला पुढे रोकता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी देखील कार्यपद्धती बदलली आहे. आज ते ज्यांचा उपयोग करतायत, त्यांच्यापैकी कदाचित ५% च लोकांना माहिती आहे की आपला उपयोग होतोय, किंबहुना ते जाणीवपूर्वक अशा शक्तींना त्या ठिकाणी साथ देत आहेत. पण ९५% लोक असे आहेत ज्यांना हे माहिती नाहीये की आपला उपयोग चाललेला आहे. ज्यांना हे माहिती नाहीये की आपण जे करतो आहोत, जे आपल्याला वाटतंय कशाकरता आपण करतो आहोत, ते त्याकरता नाहीये; त्याच्या पाठीमागचा विचार काहीतरी वेगळा आहे. अजाणतेपणे अनेक लोग हे त्यांच्यासोबत जोडताना दिसतायत आणि म्हणून बंधू-भगिनींनो, कार्यपद्धतीचा बदल हा आपल्याला देखील समजून घ्यावा लागेल असे ते म्हणाले.
पुणेकरांनी सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा
पुण्यामध्ये डीजेमुक्त गणेशोत्सवावरून गणेश मंडळाचे कार्यकर्ते, पुण्यातील नागरिक यांच्यामध्ये वादंग निर्माण झाला आहे. त्याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, मी ज्यावेळेस इथून बाहेर पडेल तेव्हा मीडिया मला पुण्याच्या संदर्भात एकच प्रश्न नक्की विचारणार आहे की, तुम्ही गणेशोत्सवाचे बोललात, मग गणेशोत्सवामध्ये डीजे वाजला पाहिजे की नाही? पण मी पुणेकरांना सांगू इच्छितो, पुण्यामध्येच ही क्षमता आहे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा केला पाहिजे हे फक्त पुणेकरच करू शकतात. त्यामुळे माझे पुणेकरांना आव्हान आहे की, या वादात न पडता पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले पाहिजे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा होतो.















