पुणे(प्रतिनिधी)–लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. पुण्यातील एस.एस.पी.एम. मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव तब्बल ३० कठोर अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि पुणे पोलिसांमध्ये निर्माण झालेला तणाव आता तूर्त निवळला असला, तरी या अटींचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्याचे मोठे आव्हान आयोजकांसमोर असणार आहे.
दिनांक २२ ऑगस्ट रोजी पुण्यात हा कार्यक्रम घेणार असल्याचे काँग्रेसने आधीच जाहीर केले होते, मात्र ऐनवेळीही पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याने काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तर अत्यंत आक्रमक भूमिका घेत, पोलिसांची परवानगी मिळो अथवा न मिळो, हा कार्यक्रम पुण्यात होणारच, असा निर्धार व्यक्त केला होता. या वादामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते आणि पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून अटींच्या चौकटीत कार्यक्रमाला परवानगी दिल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
८ ते १० हजार विद्यार्थिनींशी थेट संवाद
काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुल गांधी हे थेट विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक कार्यामुळे पुणे हे स्त्री शिक्षणाचे माहेरघर मानले जाते, म्हणूनच या पुण्यात विशेषतः विद्यार्थिनींच्या संवादाचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुमारे ८ ते १० हजार विद्यार्थिनी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ‘मुली बोलतील, देश ऐकेल’ अशा भूमिकेतून या कार्यक्रमात विद्यार्थिनींना राहुल गांधींना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. यावेळी पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च, विद्यार्थ्यांचे अधिकार, रोजगार आणि महिला सुरक्षा यांसारख्या गंभीर व महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार असून या अभियानाची सुरुवात यापूर्वी राजस्थानमधील कोटा येथून झाली होती. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
सुरक्षेसाठी पोलिसांनी आवळले अटींचे पाश
राहुल गांधींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी सुरक्षेचे अत्यंत कडक नियम आखून दिले आहेत. त्यानुसार, संपूर्ण कार्यक्रम परिसरात आणि मैदानावर कोणत्याही प्रकारच्या ड्रोन कॅमेऱ्याने छायाचित्रण किंवा चित्रीकरण करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राहुल गांधींचे व्यासपीठ अतिसुरक्षित असावे आणि त्यासमोरील ‘डी-झोन’मध्ये पूर्णपणे बॅरिकेडिंग करावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. मैदानाची जेवढी क्षमता आहे, त्यापेक्षा जास्त नागरिकांना आत प्रवेश दिला जाणार नाही आणि निमंत्रित व्यक्ती, व्हीआयपी तसेच स्वतः आयोजक समितीच्या सदस्यांनाही अधिकृत प्रवेशिकेशिवाय आत सोडले जाणार नाही. तसेच, हे व्यासपीठ आणि मंडप एखाद्या मान्यताप्राप्त व्यावसायिकाकडूनच उभारलेले असावे आणि ते सुरक्षित असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र घेणे आयोजकांना बंधनकारक राहील. तसेच कार्यक्रमाशी संबंधित सर्व विभागांची परवानगी आणि नाहरकत प्रमाणपत्रे घेणे बंधनकारक असेल.
कार्यक्रमाला विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने पोलिसांनी महिला सुरक्षेवर विशेष भर दिला आहे. यासाठी सभास्थळी महिला आणि पुरुषांसाठी पूर्णपणे स्वतंत्र आसनव्यवस्था करावी लागणार आहे. अंतर्गत सुरक्षेसाठी खासगी पुरुष आणि महिला सुरक्षारक्षकांसह पुरेशा महिला स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, महिलांच्या तपासणीसाठी असलेल्या प्रवेशद्वारांवर केवळ महिला स्वयंसेवक किंवा महिला कर्मचारीच कार्यरत असाव्यात, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच, सभास्थळी पुरेशी प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहांची व्यवस्था आणि अग्निशमन साहित्य उपलब्ध असणे आवश्यक आहे. संपूर्ण मैदान परिसरात दिवस-रात्र सुरू असणारी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यान्वित असावी लागेल आणि वीज खंडित झाल्यास पर्यायी जनरेटरची व्यवस्था सज्ज ठेवावी लागेल.
वाहतूक, पर्यावरण आणि आपत्कालीन नियोजन मैदानात ये-जा करण्यासाठी किमान ४ स्वतंत्र प्रवेशद्वारांची व्यवस्था असावी, जेणेकरून गर्दीचा खोळंबा होणार नाही. तसेच पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांसाठी एक आपत्कालीन मार्ग नेहमी मोकळा ठेवावा लागेल. आयोजकांना अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक असून कार्यक्रमस्थळी कोणत्याही ज्वलनशील पदार्थांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. याशिवाय विमानतळ प्राधिकरण आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने घालून दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करावे लागेल. कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांमुळे पुण्यातील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत पुरेशी पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक विभागाची रीतसर परवानगी मिळाल्यानंतरच पोलिसांची इतर नाहरकत परवानगी ग्राह्य धरली जाईल.
सार्वजनिक शांतता आणि कायदेशीर कारवाईचा इशारा
ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन करावे लागेल. गर्दी आणि गोंगाटामुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवणार नाही, याची सर्व जबाबदारी आयोजकांची असेल. रात्रीच्या वेळी आकाशाच्या दिशेने तीव्र प्रकाशझोत सोडण्यासही पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक, स्थानिक रहिवासी यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांवर सोपवण्यात आली आहे. मैदानावर कोणतेही आक्षेपार्ह चित्रे, प्रतिमा किंवा बॅनर लावता येणार नाहीत. कार्यक्रम नियोजित वेळेतच सुरू करून वेळेत संपवावा लागेल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कार्यक्रम रद्द करण्याचा अधिकार पोलिसांकडे राखीव असेल. तसेच जागेबाबत काही वाद निर्माण झाल्यास पोलिसांची नाहरकत परवानगी तात्काळ रद्द केली जाऊ शकते. या सर्व अटींचे उल्लंघन झाल्यास आयोजकांवर थेट कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.













