पुणे (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) जून-जुलै २०२६ परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी (दिनांक १४ जुलै २०२६) रोजी दुपारी १:०० वाजता अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. राज्याचा या परीक्षेचा एकूण निकाल ३८.७२ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निकालात मुलींनीच वर्चस्व राखले आहे.
या परीक्षेचे नियोजन मंडळाच्या वतीने १६ जून २०२६ ते ८ जुलै २०२६ या कालावधीत करण्यात आले होते, तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा ७ आणि ८ जुलै २०२६ रोजी पार पडली. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नून विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांमधील एकूण १,०३,६४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,०२,०५० विद्यार्थी परीक्षेला प्रत्यक्षात प्रविष्ट झाले आणि ३९,५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुलींची बाजी
विद्यार्थ्यांच्या लिंगनिहाय आकडेवारीचा विचार केल्यास, परीक्षेला ६७,७६७ मुले बसली होती, त्यापैकी २४,४७२ मुले उत्तीर्ण झाली असून त्यांच्या यशाची टक्केवारी ३६.११ इतकी आहे. याउलट, ३४,२८३ मुलींपैकी १५,०४६ मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलींच्या निकालाची टक्केवारी ४३.८८ आहे, जी मुलांच्या तुलनेत अधिक आहे.
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक निकाल
शाखानिहाय निकालाचा आढावा घेतल्यास विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ६४.९५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल २२.४० टक्के, कला शाखेचा २१.४० टक्के, तर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) चा निकाल १८.३४ टक्के लागला आहे. आय.टी.आय. च्या माध्यमातून प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ३०.४९ टक्के इतका आहे. विभागीय मंडळांमध्ये छत्रपती संभाजीनगर मंडळाने ५२.९० टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले आहे, तर कोकण मंडळाचा निकाल सर्वात कमी म्हणजे २०.९० टक्के लागला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत, २०२४ मध्ये निकाल ३२.४६ टक्के आणि २०२५ मध्ये ४३.६५ टक्के होता, त्या तुलनेत यावर्षी निकालात घट झाल्याचे दिसून येते.
कॉपीमुक्त अभियान’
मंडळाने यंदा अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये राबवली होती. खाजगी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून त्यांना जून-जुलै २०२६ च्या परीक्षेसाठी नोंदणी करण्याची विशेष संधी प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली होती. परीक्षा काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यभर भरारी पथके तैनात करण्यात आली होती आणि प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीने ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबवण्यासाठी १० जून २०२६ रोजी ऑनलाईन सभा घेऊन सूचना दिल्या होत्या. तसेच, १८ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्व सवलती देण्यात आल्या होत्या.
गुणपडताळणी कशी कराल
निकालानंतरच्या प्रक्रियेबाबत मंडळाच्या सचिव डॉ. अनुराधा ओक यांनी माहिती दिली की, गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी १५ जुलै ते २४ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय ५० रुपये, तर छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये शुल्क आकारले जाईल. पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम छायाप्रत घेणे अनिवार्य असून, ती मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत प्रति विषय ३०० रुपये शुल्कासह ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
ज्या विद्यार्थ्यांना आपली श्रेणी सुधारायची आहे, त्यांच्यासाठी ‘श्रेणी सुधार’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी-मार्च २०२७, जून-जुलै २०२७ आणि फेब्रुवारी-मार्च २०२८ अशा सलग तीन संधी उपलब्ध असतील. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद गोसावी आणि सचिव यांनी अभिनंदन केले असून, अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा उमेदीने प्रयत्न करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थी त्यांचा सविस्तर निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात व त्याची प्रत डाऊनलोड करू शकतात.










