संत तुकाराम महाराजांची पालखी उद्योगनगरीत दाखल :लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय स्वागत

संत तुकाराम महाराजांची पालखी उद्योगनगरीत दाखल
संत तुकाराम महाराजांची पालखी उद्योगनगरीत दाखल

पिंपरी : टाळ-मृदंगाचा गजर, विठू नामाचा गजर आणि ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या अखंड जयघोषात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा बुधवारी सायंकाळी उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाला. या सोहळ्यामुळे अवघी उद्योगनगरी भक्तिरसात दुमदुमून गेली होती. निगडी येथील ऐतिहासिक भक्ती-शक्ती चौकात पालखीचे स्वागत करण्यासाठी भाविकांचा अभूतपूर्व उत्साह आणि अलोट गर्दी पाहायला मिळाली.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मंगळवारी मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून पंढरपूरकडे अधिकृत प्रस्थान ठेवले. प्रस्थान झाल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम देहू गावातीलच इनामदार वाड्यात झाला होता. बुधवारी सकाळी इनामदार वाड्यात पालखीची पारंपरिक शासकीय पूजा संपन्न झाली आणि त्यानंतर हा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने मार्गस्थ झाला. मार्गावर असलेल्या अनगडशाह बाबा यांच्या दर्ग्याजवळ आणि चिंचोली पादुका येथे पालखी विसावली, जिथे भाविकांनी भक्तीभावाने अभंग गायन आणि आरती केली. लाखो वारकऱ्यांच्या शिस्तीत आणि उत्साहात हा सोहळा सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत दाखल झाला. यावेळी महापौर रवी लांडगे यांनी स्वतः पालखीचे सारथ्य करत सोहळ्याला मार्गस्थ केले.
पालखीच्या आगमनामुळे पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते. वर्षातून एकदा येणारा हा सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी आणि माउलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी शहरातील अबालवृद्धांनी रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे सर्व प्रमुख रस्ते वारकरी आणि भाविकांनी अक्षरशः फुलून गेले होते. बुधवारी रात्री या पालखी सोहळ्याचा मुक्काम आकुर्डी येथील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आहे, तर गुरुवारी पहाटे हा पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल.
———————
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्याचे अधिकृत आणि भव्य स्वागत करण्यात आले. प्रशासनाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी विशेष तयारी केली असून, पालिकेच्या वतीने सोहळ्यातील प्रत्येक दिंडी प्रमुखाला तातडीच्या उपचारासाठी ‘वैद्यकीय प्रथमोपचार पेटी वितरित करण्यात आली. तसेच सर्व मानकरी आणि दिंडी प्रमुखांना पुष्पहार व श्रीफळ देऊन पालिकेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या स्वागत सोहळ्याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, कुलदीप जंगम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि उपायुक्त अण्णा बोदडे यांच्यासह पालिकेचे विविध अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उद्या तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी प्रस्थान : कसा असणार पालखी सोहळा?