पुणे: राष्ट्रीयएकात्मता, करुणा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत ‘आम्ही पुणेकर’ आणि काफिला फाऊंडेशन (जम्मू-काश्मीर) यांच्या संयुक्त विद्यमाने काश्मीरमधील सीमावर्ती भागांत पाच दिवसीय मानवतावादी मदत मोहीम राबविण्यात आली. उरी (बारामुल्ला), लोलाब व केरन (कुपवाडा) या दुर्गम भागांत हा उपक्रम पार पडला.
‘हर घर शिक्षा, घर घर शिक्षा’ या ब्रीदवाक्याखाली आयोजित या मोहिमेचा मुख्य उद्देश शिक्षणाचा प्रसार आणि तरुणांमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध जनजागृती करणे हा होता. तसेच २२ एप्रिलच्या पहलगाम घटनेच्या स्मृतीनिमित्त शांतता, एकता आणि ध्येयवादाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये शाळेच्या बॅगा, वह्या, पाण्याच्या बाटल्या, डबे आदींचा समावेश होता. ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय किट्सचे वितरण करून त्यांच्या मूलभूत आरोग्य गरजांकडेही लक्ष देण्यात आले. याशिवाय उरी सेक्टरमधील कठीण भूप्रदेशात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी दोन जनरेटर संच, दोन वॉटर पंप आणि सुमारे १,२०० मीटर एचडीपीई पाइपलाइन उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमात जनक शाह, मान मेहुल शाह, आर्या मेहुल शाह, देव सिद्धार्थ शाह, रेवा महेश सोमाणी, दीपेश शाह, अपर्णा शाह, राहुल लढ्ढा राखी लढ्ढा आणि मयंक महेश सोमाणी विपुल कांबळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव म्हणाले, हा उपक्रम केवळ मदत वाटपापुरता मर्यादित नसून, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे, समुदायांना सक्षम करणे आणि शेवटच्या घटकापर्यंत सन्मानाने पोहोचणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारतीय सैन्याचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कॉसमॉस जनक शाह आणि प्रोजेक्ट नर्चर यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.












