Sharad Pawar On Devendra Fadnvis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्याबाबतची प्राथमिक चर्चा ही पूर्णतः अंतर्गत होती. ही चर्चा केवळ दिवंगत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातच सुरू होती. “या प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांचा दूरान्वयेही संबंध नव्हता, मग त्यांना या विषयावर भाष्य करण्याचा अधिकार काय?” असा प्रश्न जेष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित केला. विलीनीकरणाची तारीख १२ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती, मात्र या अपघातामुळे ती प्रक्रिया थांबली असल्याचे संकेतही त्यांनी दिले. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल शरद पवार यांनी आपल्याला या निवडीचा आनंद असल्याचे सांगत या विषयावर जास्त्यांत बोलणे टाळले. बुधवारी बारामती येथे पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, या दुःखाच्या सावटातही आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बारामती विमानतळावर धावपट्टीजवळ झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा अंत झाला. या घटनेनंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सुनेत्रा पवारांच्या या निवडीवर शरद पवारांनी समाधान व्यक्त केले असले, तरी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचे हे दावे फेटाळून लावत, “अजित पवार आणि माझे संबंध असे होते की ते प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करत असत. निधनाच्या आदल्या दिवशीही आम्ही तासभर गप्पा मारल्या होत्या. जर विलीनीकरणासारखी मोठी हालचाल सुरू असती, तर त्यांनी भाजपला किंवा मला विश्वासात घेतले नसते का?” असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. एनडीएमध्ये स्थिर असताना अजित पवार सरकारमधून बाहेर पडण्याचा किंवा विलीनीकरणाचा विचार का करतील, असे सांगत त्यांनी विरोधक केवळ संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे.
राजकीय निर्णयांबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही
सध्याच्या परिस्थितीत शरद पवार यांनी राजकीय निर्णयांपेक्षा कौटुंबिक सांत्वनाला अधिक महत्त्व दिले आहे. बारामती येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सध्या त्यांचे संपूर्ण लक्ष दुःखात असलेल्या सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यावर आहे आणि राजकीय निर्णयांबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही. आपल्या ५८ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच अर्थसंकल्पाच्या दिवशी संसदेत उपस्थित राहू शकलो नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. विधानसभा किंवा लोकसभा सदस्य म्हणून काम करताना गेल्या ५८ वर्षात कधीही अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अनुपस्थित न राहण्याचा आपला विक्रम कौटुंबिक घटनेमुळे खंडित झाल्याचे त्यांनी नमूद केले.
भारत-अमेरिका कृषी कराराबाबत चिंता
शरद पवार यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारत-अमेरिका कृषी कराराबाबतही मोठी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकन कृषी उत्पादनांना भारतात सवलत मिळाल्यास भारतीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ५८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत पहिल्यांदाच कौटुंबिक आघातामुळे आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अनुपस्थित राहिलो, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. सध्या पवार कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच, विलीनीकरणाच्या या ‘टोकदार’ वादामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवारांचा अपघात आणि स्मारक चर्चा
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर खासदार अरविंद सावंत आणि संजय राऊत यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यावर पवार म्हणाले की, जोपर्यंत अधिकृत माहिती समोर येत नाही, तोपर्यंत संशय व्यक्त करणे योग्य नाही. तसेच, बारामतीमध्ये अजित पवारांच्या स्मारकाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ज्या संस्थेच्या जागेवर स्मारक करण्याची चर्चा आहे, त्या संस्थेचा अध्यक्ष मी स्वतः आहे आणि अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाही. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल बोलताना त्यांनी आनंद व्यक्त केला.
अर्थसंकल्प आणि देशाची सुरक्षा
देशाच्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना पवारांनी सांगितले की, कौटुंबिक कारणामुळे ते संसदेत जाऊ शकले नाहीत, परंतु या अर्थसंकल्पातून सामान्य माणसाचे हित डावलले गेले आहे अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी देशाच्या सुरक्षेबाबत संसदेत सविस्तर चर्चा व्हायला हवी होती, असे मतही मांडले.










