पुणे(प्रतिनिधी)—विमान अपघातात मृत्यू झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहतील. तसेच केंद्रातील आणि राज्यातील काही महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहतील. या कारणास्तव बारामतीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात नो फ्लाय झोन लागू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग (प्रोटोकॉल) नुसार, उद्या गुरुवारी (२९ जानेवारी) सकाळी ११ वाजता पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. राज्यात तीन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, अजित पवार यांचे पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले होते. तिथं अभूतपूर्व गर्दी झाली होती. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आलं. याठिकाणी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आलं असून आज रात्री १० वाजेपर्यंत विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. उद्या सकाळी ६ ते ९ त्यांच्या मुळगावी काटेवाडी इथं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा विद्या प्रतिष्ठान चौक आणि भिगवण रोड सेवा रस्त्यावरून मार्गक्रमण करेल. तर सकाळी ११ च्या दरम्यान विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील. अंत्यसंस्कारावेळी अजित पवारांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे.
नेते मंडळींसह कार्यकर्त्यांना अश्रु अनावर
अजित पवार यांचे राज्यातील असो किंवा केंद्रातील, प्रत्येक नेत्यांशी त्यांचे जवळचे आणि चांगले नाते होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच नेते मंडळींसह कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले. अनेकांनी समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त केलं.
















