समाजात बुद्धिभेद निर्माण करणे भाजपचे काम – हर्षवर्धन सपकाळ

समाजात बुद्धिभेद निर्माण करणे भाजपचे काम
समाजात बुद्धिभेद निर्माण करणे भाजपचे काम

पुणे(प्रतिनिधी)–प्रामाणिकपणा हा आपल्या देशाचा मूळ स्वभाव असून तो सध्या आपण विसरत चाललो आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) काम समाजात बुद्धिभेद निर्माण करणे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम एखाद्या गोष्टीवर ताबा मिळवणे आहे.आपला स्वाभिमान आपली भाषा ,धर्म, लिंग यात नाही तर इतिहासात आणि कर्तृत्ववात आहे. आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आपण समजून घेतला पाहिजे असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.

काँग्रेसचे माजी आमदार मोहनदादा जोशी यांच्या संकल्पनेतून काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व यूपीएच्या अध्यक्षा खा. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त २१ व्या ‘सेवा_कर्तव्य_त्याग’ सप्ताह या उपक्रमाचे आयोजन दि. २ ते ९ डिसेंबर २०२५ या कालावधीत करणात आले आहे. याचे उद्घाटन मंगळवारी एस.एम.जोशी फाउंडेशन सभागृह नवी पेठ, पुणे येथे करण्यात आले.काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रदेश काँगेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहनदादा जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, संजय बालगुडे, श्रीरंग चव्हाण, कैलास कदम,अविनाश साळवे, सुनील मलके, वीरेंद्र कराड, चंद्रशेखर कपोते,अमीर शेख, हनुमंत पवार, अविनाश बागवे,काँग्रेस महिला शहराध्यक्ष  स्वाती शिंदे, युवक काँग्रेस अध्यक्ष चेतन अग्रवाल, सौरभ अमराळे, लता राजगुरू उपस्थित होते.

अधिक वाचा  'इसरो'चे माजी अध्यक्ष के. सिवन यांना 'एआयटी'तर्फे जीवनगौरव पुरस्कार

सपकाळ म्हणाले, महात्मा गांधी यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो कारण हा देश एकसंध कधी नव्हता पण गांधी यांनी भारत नावाचे स्पंदन निर्माण करून “राष्ट्र”  नावाची संकल्पना सर्वांच्या मनात रुजवली. भारत या संकल्पनेला जन्म देण्याचे महत्वपूर्ण काम गांधी यांनी केले. राजकारणात सध्या सेवेचे नाही तर मेवा मिळवण्याचे खटाटेप सुरू आहे. सेवाच्या मागे मेवा आहे की भय आहे हे तपासून पहिले पाहिजे. जेल मध्ये गेल्यावर माणसाचे मानसिक संतुलन बिघडते कारण तिथे डांबून ठेवले जात कोणते स्वातंत्र्य मिळत नाही. त्यामुळे काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिले हे समजून घ्यावे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या योगदानाबाबत आपण विसरत आहे. सोनिया गांधी यांना अनेक अडचणी राजकारणात आल्यावर आल्या परंतु त्यावर त्यांनी मात केली. २२ वर्षाचा असताना त्या विवाह करून भारतात आल्या आणि २२ वर्ष संसार राजीव गांधी यांच्या सोबत केला. पण,त्यानंतर देखील देशाची सून म्हणून त्या अद्याप काम करतात याचा अभिमान देशवासीयांना वाटला पाहिजे.सोनिया गांधी एक विचार असून त्या त्याग, विचार संस्कृती पुढे घेऊन जात आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्याचे काही पडले नाही. काँग्रेस नेतृत्व आणि विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे ते काम करत आहे.राज्याचे मुख्यमंत्री हे समता, बंधुता, मूल्यांवर नांगर फिरवत आहेत.सगळ्या जातीत भांडणे लावली जात आहेत.राज्यघटना आणि लोकशाही फासावर लटकवण्याचे प्रकार सुरू आहेत.महाराष्ट्रातील सामाजिक व्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे मी त्यांची तुलना औरंगजेबाशी  केली होती यात माझी जीभ काय घसरली.संविधान दिनाच्या दिवशी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना पकडण्यात आले त्यामुळे मी त्यांना जल्लाद म्हणालो. नथुराम, जल्लाद, औरंगजेब, गजनी असे शब्द आजच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलावे लागणे दुःखदायक आहे.मात्र,आज देखील मी माझ्या या शब्दाबाबत मतावर ठाम आहे असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  #Nikhil Wagle: निखिल वागळे यांच्या विरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार 

उल्हास पवार म्हणाले, पुणे हे सुशिक्षतांचे शहर असून लोकांना काँग्रेसने काय केले हे माहिती नाही असे नाही. धर्मांधता आणि जातीयवाद याचे विष मोठ्या प्रमाणात सध्या पेरले गेले असल्याने लोकांना कोणते भान राहिले नाही.भाजपच्या काळात अनेक गोष्टी नामशेष करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे हे जनतेच्या समोर आले पाहिजे. एनडीए मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असताना त्याच महत्वपूर्ण संस्थेजवळ बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्याचा नेमका हेतू काय हे तपासले पाहिजे. भाजप जवळ सांगण्यासारखे त्यांच्या सत्ता काळातील काहीच नाही. देशाचे ऐक्य हे सर्वधर्म समभाव मध्ये आहे.

मोहनदादा जोशी म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर झंझावती दौरा करून ६५ पेक्षा अधिक जाहीर सभा घेतल्या. मुख्यमंत्री यांच्या विरोधात कोणी बोलण्याची हिंमत करत नसताना,त्यांचा पर्दाफाश करून खरा चेहरा लोकांसमोर आणला. पक्षात संघटन बांधणी मधून  काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचे काम हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत सत्ताधारी यांना संदेश देण्यासाठी यंदाच्या वर्षी या सप्ताहाची सुरवात महत्वपूर्ण राहील. काँग्रेस पक्षाचे पक्ष “पंजा” चिन्हे एक आठवड्यात पाच हजार दुचाकीवर लावले जाईल. पुण्याला जागतिक दर्जाचे शहर करण्यात काँग्रेसचे योगदान महत्त्वपूर्ण असून काँग्रेस काळातील मोठया प्रकल्पाची माहिती प्रचार करण्याकरिता “होय हे काँग्रेसने केले” ही प्रचार मोहीम होर्डिंग्जद्वारे राबविण्यात येत आहे. आतापर्यंतचे काँग्रेस पक्षाचे योगदान प्रत्येक पुणेकर यांना अभिमान वाटावा असे आहे. पुणे शहर उभे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे याबाबत कार्यकर्त्यांनी प्रचार करावा.

अधिक वाचा  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साडेदहा हजारहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘सेवा_कर्तव्य_त्याग’ सप्ताह या उपक्रमाचे संयोजक माजी आमदार मोहनदादा जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश अबनावे यांनी तर आभार प्रदर्शन गौरव बोराडे यांनी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love