
Mohan Bhagvat: “जगाला सध्या भेडसावणाऱ्या समस्यांवर भारतीय चिंतन पद्धती हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे भारताने स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर चालून जगासमोर एक यशस्वी उदाहरण ठेवले पाहिजे,” असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. विजयादशमी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणात हिंदू राष्ट्राची संकल्पना, सामाजिक समरसता, पर्यावरण आणि व्यक्ती निर्माणातून व्यवस्था परिवर्तनावर संघाची भूमिका सविस्तरपणे मांडली.
व्यक्ती निर्माणातून व्यवस्था परिवर्तन हाच मार्ग
सरसंघचालकांनी स्पष्ट केले की, जगातील प्रचलित व्यवस्था बदलणे आवश्यक आहे, पण हा बदल हिंसक मार्गाने किंवा क्रांतीने येऊ शकत नाही. त्यांनी फ्रान्स आणि साम्यवादी क्रांतीचे उदाहरण देत म्हटले की, अशा क्रांतीने त्यांचे उद्दिष्ट कधीच साध्य केले नाही. खरा बदल हा व्यक्ती निर्माणातून सुरू होतो. “व्यक्ती निर्माण, त्यातून समाज परिवर्तन आणि समाज परिवर्तनातून व्यवस्था परिवर्तन,” हाच खरा आणि स्थायी मार्ग आहे, असे ते म्हणाले. भाषणे किंवा पुस्तकांनी समाजात बदल होत नाही, तर जे बदल अपेक्षित आहेत, ते स्वतःच्या आचरणात आणणारे आदर्श व्यक्ती निर्माण करावे लागतात. संघाची शाखा हेच व्यक्ती निर्माण करण्याचे, म्हणजेच चांगल्या सवयी लावण्याचे माध्यम आहे आणि संघ गेली १०० वर्षे अविरतपणे हेच कार्य करत आहे, असे त्यांनी नमूद केले.
‘हिंदू राष्ट्र’ हीच आपली राष्ट्रीयता
भारताच्या एकात्मतेचा आधार आपली प्राचीन संस्कृती आहे, जिला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘अंतर्निहित सांस्कृतिक एकता’ म्हटले आहे. ही संस्कृती सर्वसमावेशक आहे आणि तिचे जतन या देशातील हिंदू समाजाने केले आहे, त्यामुळे तिला हिंदू संस्कृती असेही म्हटले जाते. “विविधतेचा पूर्ण स्वीकार आणि सन्मान करत सर्वांना एका माळेत गुंफणारी ही भारतीय संस्कृती म्हणजेच आपली राष्ट्रीयता आहे आणि यालाच आम्ही हिंदू राष्ट्रीयता म्हणतो,” असे भागवत यांनी स्पष्ट केले. ज्यांना ‘हिंदू’ शब्दावर आक्षेप आहे, ते भारतीय किंवा हिंदवी असे शब्द वापरू शकतात, पण राष्ट्रीयतेचे स्पष्ट स्वरूप दाखवणारा ‘हिंदू’ हाच शब्द आहे असे ते म्हणाले. हिंदू समाज हा या देशाचा उत्तरदायी समाज (Responsible Society) असून, तो संघटित आणि शक्तिशाली असणे हे देशाच्या एकात्मतेची, सुरक्षेची आणि विकासाची हमी आहे.
स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा आग्रह
जागतिक अर्थव्यवस्थेवर टीका करताना भागवत म्हणाले की, प्रचलित आर्थिक प्रणालीमुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत आहे, पर्यावरणाचे नुकसान होत आहे आणि काही मूठभर लोकांच्या हातात आर्थिक सामर्थ्य एकवटत आहे. अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणाचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांवर अवलंबून राहणे आवश्यक असले तरी, हे अवलंबित्व आपली मजबुरी बनता कामा नये. यासाठी स्वदेशी आणि स्वावलंबनाला पर्याय नाही. आपल्याला आत्मनिर्भर बनावे लागेल.
राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत आव्हाने
मागील वर्षातील घटनांचा आढावा घेताना, सरसंघचालकांनी सांगितले की सीमापार दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्याला पल्या लष्कराने दिलेले चोख प्रत्युत्तर, यातून आपल्या नेतृत्वाची दृढता आणि लष्कराचे शौर्य दिसून आले. मात्र या घटनेने आपल्याला सुरक्षेबाबत अधिक सजग आणि समर्थ राहण्याची गरज शिकवली आहे. देशांतर्गत नक्षलवादी चळवळींवर शासनाने केलेल्या कारवाईचे त्यांनी कौतुक केले, पण त्याचवेळी ज्या भागात या चळवळी वाढल्या, तेथे न्याय, विकास आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी शासन आणि समाज या दोघांनीही प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
‘पंच परिवर्तन’ कार्यक्रमावर भर
संघाच्या शताब्दी वर्षात, संघाचे कार्य भौगोलिक आणि सामाजिक दृष्ट्या सर्वव्यापी करण्यावर भर दिला जाईल. यासोबतच, समाजात सहज आचरण बदल घडवून आणण्यासाठी ‘पंच परिवर्तन’ कार्यक्रमावर लक्ष केंद्रित केले जाईल. यात सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्व-बोध व स्वदेशी, आणि नागरिक शिस्त व संविधानाचे पालन या पाच विषयांचा समावेश आहे. समाजातील इतर व्यक्ती आणि संघटनांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पुढे नेला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जगाला भारताकडून अपेक्षा
आज जग अनेक समस्यांनी ग्रस्त आहे, जसे की युद्धे, पर्यावरणाचा प्रकोप, कुटुंबांमधील विघटन आणि वाढता अनाचार. या परिस्थितीत, जगाला एक नवा मार्ग दाखवण्याची क्षमता भारतात आहे आणि जगाला भारताकडून तशी अपेक्षाही आहे. भारताची दृष्टी भौतिक विकासाबरोबरच मन, बुद्धी आणि अध्यात्माचाही विचार करते. भारताची भूमिका नेहमीच जगात संतुलन निर्माण करणारी आणि संयम व मर्यादांची जाणीव करून देणारी राहिली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेले हेच कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.