पुणे (प्रतिनिधी) — जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एका अमेरिकन नागरिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींकडून ख्रिश्चन धर्म आणि येशूला देव म्हणून स्वीकारल्यास सुख, शांती, संपत्ती आणि मानसिक स्वास्थ्य मिळेल, तसेच भविष्यात आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात एका अल्पवयीनाचाही सहभाग आढळला असून तो भारतीय ख्रिश्चन धर्म प्रसारक आऱोपीचा मुलगा आहे.
या प्रकरणात शेफर जाविन जेकॉब (वय ४१, मूळ रा. कॅलिफोर्निया, अमेरिका, सध्या – मुकाई चौकाजवळ, पुणे) (Shefer Javin Jacob), आणि स्टीव्हन विजय कदम (वय ४६, रा. उद्यमनगर, अजमेरा, पिंपरी, पुणे) (Steven Vijay Kadam) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत एक अल्पवयीन मुलगाही या प्रकरणात सहभागी होता. हा अल्पवयीन मुलगा भारतीय ख्रिस्ती धर्मप्रसारक आरोपी स्टीव्हन कदम (Steven Kadam) याचा मुलगा असल्याचे सांगण्यात आले आहे. अल्पवयीन मुलाला चौकशीनंतर त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सनी बन्सीलाल दनानी (वय २७, रा. पिंपरी कॅम्प, वैष्णोदेवी मंदिराजवळ) (Sunny Bansilal Danani) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दनानी (Danani) हे सिंधी समाजाचे असून, त्यांच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी मानसिक दबाव टाकला जात होता. आरोपी त्यांना “तुम्ही येशूला देव म्हणून स्वीकाराल तर सुख, शांती, संपत्ती आणि मानसिक स्वास्थ्य मिळेल. इतर सर्व देव-धर्म केवळ कथा आहेत,” असे सांगत होते. सिंधी समुदायाच्या मोठ्या वस्ती असलेल्या पिंपरी कॅम्प भागात आरोपी बायबलची पत्रके वाटप करून लोकांना ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत होते. फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांनी “प्रभू येशूच खरा देव आहे, इतर धर्म आणि देव केवळ काल्पनिक आहेत,” असे सांगत धर्मांतराचा आग्रह केला आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवले. मात्र, फिर्यादी दनानी (Danani) या आमिषाला बळी पडले नाहीत.
पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास
पिंपरी पोलिसांनी तक्रारदाराची तक्रार नोंदवून तत्परतेने कारवाईला सुरुवात केली. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९, ३(५) आणि विदेशी नागरिक कायदा कलम १४ (ब)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासात आरोपींकडून दोन मोबाईल जप्त केले आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील (Vijayanand Patil) हे करत आहेत.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग (Ashok Kadalag) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन नागरिक शेफर जेविन जेकॉब (Shefer Javin Jacob) हा बिझनेस व्हिसावर भारतात आला होता. २०१६ पासून तो याच व्हिसावर वारंवार भारतात येत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याने यापूर्वी असे धर्मांतराचे इतर कुठे प्रयत्न केले आहेत किंवा ते करून घेतले आहेत का, याचा शोध आता पोलिसांनी सुरु केला आहे.
या प्रकरणात सेंट्रल पंचायत (Central Panchayat) या सिंधी समाजाच्या पंचायत फेडरेशनने फिर्यादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने हा धर्मांतराचा प्रयत्न फोल ठरला. फिर्यादी सनी दनानी (Sunny Danani) यांनी तात्काळ आपला मित्र हर्षित नरवानी (Harshit Narwani) यांना फोन करून माहिती दिली, त्यानंतर वरद कुलकर्णी (Varad Kulkarni) आणि अभिजीत शिंदे (Abhijit Shinde) यांच्यासह ते फिर्यादींच्या घरी आले आणि त्यांनी मिळून आरोपींना पोलिसांच्या हवाली केले. या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.