पुणे(प्रतिनिधि)–वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण आणि कस्पटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेल्या निलेश चव्हाणच्या पुण्यातील कर्वेनगर येथील घरी पुणे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री उशिरा छापा टाकला. वारजे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या छाप्यातून पोलिसांना निलेश चव्हाणचा लॅपटॉप आणि इतर काही डिजिटल उपकरणे मिळाली असून, जप्त केलेल्या लॅपटॉपमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या वडिलांना आणि भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. निलेश चव्हाण नेमका कुठे आहे आणि त्याचा हगवणे कुटुंबाशी काय संबंध आहे, याची सखोल चौकशी पोलीस त्यांच्याकडे करणार आहेत.
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुणे पोलिसांच्या पथकाने कर्वेनगर येथील निलेश चव्हाणच्या राहत्या घरी, जिथे त्याचे कार्यालयही आहे, तिथे धाड टाकली. इमारतीच्या गेटला आतून कुलूप लावलेले होते आणि लिफ्ट देखील बंद होती, तरीही पोलिसांनी मोठ्या शिताफीने आत प्रवेश केला. मात्र, पोलिसांना निलेश चव्हाण घरात आढळला नाही, तो यापूर्वीच फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या घरातून त्याचा लॅपटॉप आणि काही गॅजेट्स जप्त केले आहेत. या जप्त केलेल्या लॅपटॉपमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ असल्याचे समोर येत आहे.
वैष्णवीच्या बाळाच्या प्रकरणात धमकीचा आरोप
वैष्णवी हगवणे प्रकरणात कस्पटे कुटुंबाने केलेल्या आरोपानुसार, वैष्णवीचे लहान बाळ निलेश चव्हाणकडे दोन दिवस ठेवण्यात आले होते. निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिश्मा हिचा मित्र असून, करिश्मानेच वैष्णवीचे बाळ निलेशकडे दिले होते असे सांगितले जात आहे. जेव्हा बाळाचा ताबा परत मागण्यासाठी कस्पटे कुटुंबीय निलेशकडे गेले, तेव्हा त्याने त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावले. या धमकावल्याच्या प्रकरणीच त्याच्यावर वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाच्या जवळचा मानला जातो.
निलेशच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना; वडील आणि भाऊ ताब्यात
गुन्हा दाखल झाल्यापासून निलेश चव्हाण फरार असून, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पुणे पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथके विविध ठिकाणी रवाना झाली असून काल रात्री छापा टाकल्यानंतर आज सकाळी पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या वडिलांना आणि भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. निलेश चव्हाण नेमका कुठे आहे आणि त्याचा हगवणे कुटुंबाशी काय संबंध आहे, याची सखोल चौकशी पोलीस त्यांच्याकडे करणार आहेत.