पुणे(प्रतिनिधि)– सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लि. च्या कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकी (CSR) उपक्रमांतर्गत सायबेज फाउंडेशनने पुण्यातील ऐतिहासिक येरवडा मध्यवर्ती कारागृहात एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला आहे. कैद्यांना भेटायला येणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज प्रतीक्षालयाचे नुकतेच (१९ मे २०२५) लोकार्पण करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागवले जावे, या तत्त्वावर आधारित हा उपक्रम तुरुंगवासाला सामोऱ्या जाणाऱ्यांच्या कुटुंबीयांना सन्मानजनक सुविधा प्रदान करण्याच्या हेतूने राबवण्यात आला आहे.
समाजापासून दूर असलेल्यांसाठी आशेचा किरण
हे नवीन प्रतीक्षालय समाजापासून दूर कोठडीत असलेल्या व्यक्तींप्रती असलेला दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. लहान मुलांना घेऊन येणाऱ्या मातांपासून ते लांबचा प्रवास करून येणाऱ्या वृद्ध पालकांपर्यंत, सर्व कुटुंबीयांना येथे सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक सुविधा मिळेल. यामुळे त्यांना भावनिक आणि शारीरिक संघर्षाला तोंड देणे अधिक सोपे होईल, असे सायबेज फाउंडेशनने म्हटले आहे.
सहवेदना आणि प्रयत्नांचे प्रतिबिंब: रितू नथानी
या उपक्रमाबाबत बोलताना सायबेज फाउंडेशनच्या प्रमुख आणि सायबेज सॉफ्टवेअरच्या संचालक मंडळाच्या सदस्य रितू नथानी म्हणाल्या, “हे प्रतीक्षालय केवळ विटा आणि सिमेंटचा ढाचा नाही, तर ती सदभावना आणि सहवेदना यातून उभारलेली जागा आहे. अनेकदा खेड्यापाड्यांतून आलेली कुटुंबे आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटण्यासाठी लांबचा आणि थकवणारा प्रवास करतात. वर्षानुवर्षे ही कुटुंबे उन्हात, पावसात आणि समाजाच्या तिरस्कारपूर्ण नजरेत उभं राहून आपल्या व्यक्तीची वाट बघतात. या उपक्रमातून आम्ही या कुटुंबियांना एवढंच सांगू इच्छितो की, आम्हाला तुमची काळजी आहे आणि तुम्हालाही सन्मान मिळायला हवा.” सायबेज फाउंडेशनमध्ये त्यांचे प्रयत्न नेहमी वास्तवतेला धरून आणि परिणाम साधणारे असतात, आणि हा प्रकल्प याच तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे, असेही नथानी यांनी नमूद केले.
प्रतीक्षालयातील अत्याधुनिक सोयीसुविधा
या नव्या प्रतीक्षा कक्षामध्ये १००० हून अधिक लोकांसाठी आसनव्यवस्था उपलब्ध आहे. याशिवाय, स्वच्छ स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, अल्पोपहाराची सुविधा, मातांसाठी स्तनपान कक्ष, मुलाखत कक्षापर्यंत सुरक्षित मार्ग, कायदेशीर सल्ला कक्ष आणि अद्ययावत नोंदणी विभाग यांचा समावेश आहे. सायबेज फाउंडेशनने हा प्रकल्प पूर्णपणे स्वतःच्या सीएसआर कार्यक्रमाअंतर्गत विकसित केला आहे, यामध्ये कारागृह प्रशासन आणि स्थानिक सरकारी यंत्रणांसोबत जवळून समन्वय साधण्यात आला.
कारागृह प्रशासनाकडून उपक्रमाचे स्वागत
येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक श्री. सुनील ढमाळ यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. ते म्हणाले, “इथे येणाऱ्या कुटुंबांमध्ये अशी अनेक माणसं असतात, जी भावनिक वेदना बाळगून असतात, जी कोणालाही दिसत नाही. ही सुविधा, भेटायला येणाऱ्या कुटुंबांच्या अनुभवामध्ये मोठा फरक घडवून आणेल. आम्ही सायबेज फाउंडेशनचे या अर्थपूर्ण सहवेदनेबद्दल मन:पूर्वक आभार मानतो.”
इतिहास आणि परंपरांनी समृद्ध असलेले येरवडा कारागृह आता एका अशा प्रकल्पाचे साक्षीदार झाले आहे, जे मानवी दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांचे भविष्य दर्शवते. हे प्रतीक्षालय भावना आणि कृती यांचा सुंदर संगम आहे. दरवर्षी अंदाजे ३.५ लाखांहून अधिक नागरिक या प्रतीक्षालयाचा लाभ घेतील असा अंदाज आहे.