पुणे- सध्याच्या बिकट स्थितीतील प्रश्न केवळ प्रशासन सोडवू शकणार नाही तर प्रशासनाच्या प्रयत्नाला समाजाची जोड मिळायला हवी. तरच आपण सध्याच्या संकटावर मात करू शकू, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीणजी दबडघाव यांनी व्यक्त केला.
गरवारे महाविद्यालय येथे कोरोना रूग्णांसाठी सुरू असलेल्या कोविड उपचार केंद्रावर सेवा भावनेतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनुभव कथनावर आधारीत “सामर्थ्य सेवेचे” या ई- बुकचे प्रकाशन प्रसिध्द उद्योजक सुधीर मेहता यांच्या हस्ते आणि समर्थ भारत पुनर्बांधणी योजनेचे संयोजक रवींद्र शिंगणापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटल पध्दतीने संपन्न झाले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. दबडघाव बोलत होते.
गरवारे महाविद्यालय येथे जनकल्याण समिती, समर्थ भारत पुनर्बांधणी योजना, पुणे महानगर पालिका आणि पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स (पीपीसीआर) या संस्थांच्या सहभागातून एक सर्व सुविधायुक्त असे कोविड आरोग्यसेवा केंद्र उभे करण्यात आले आहे. तेथे कोरोना रूग्णसेवा करत असलेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, गरवारे महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय अधिकारी/कर्मचारी, केंद्राला अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था-संघटनांचे प्रतिनिधी आणि या कामात स्वतःला झोकून देऊन काम करणारे जनकल्याण समितीचे तरूण कार्यकर्ते या सर्वांनी कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या रूग्णांना आपल्या मनःपूर्वक सेवाभावाने जिंकले असून त्यामुळे शेकडो रूग्ण बरे होवून निश्चिंत मनाने घरी गेले आहेत. याच मौलीक अनुभवांचे मोल समाजासमोर येण्यासाठी व त्यातून एक आशादायक वातावरण निर्मिती होण्यासाठी भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्र यांनी “सामर्थ्य सेवेचे” या ई- बुकची निर्मिती केली.
डॉ. दबडघाव म्हणाले, “कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये संघाच्या वतीने अनेक कुटुंबांना सर्व प्रकारची मदत करण्यात आली. कालांतराने अन्य प्रांतातील बंधू-भगिनींना त्यांच्या प्रांतांमध्ये सुखरुप पोचविण्याची, त्यांची राहण्याची आणि जाण्याची व्यवस्था करण्यात आली. पुण्यामध्ये आणि ग्रामीण भागातील सर्व हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क केला आणि कुठल्याही प्रकारची मदत आमचे सर्व कार्यकर्ते करतील, सगळा समाज तुमच्या बरोबर आहे अशा प्रकारचा विश्वास निर्माण केला. या कार्यात अनेक तरुण कार्यकर्ते उतरले. जीवाचा धोका पत्करून अनेक युवक आणि युवतींनी सहभाग घेतला. प्रशासकीय अधिकारीही सर्व जण अत्यंत मनापासून आणि सेवाभावी वृत्तीने या कामांमध्ये उतरले होते. या देशासाठी आणि समाजासाठी मला काहीतरी करायचे हा भाव या प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनामध्ये असल्यामुळे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन काम केल्यामुळे सर्व शक्य झाले.”
ते म्हणाले, की शासनावर अवलंबून न राहता परंतु शासनाला बरोबर घेऊन काम केल्यामुळे या केंद्राने आज रुग्णांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.
श्री. मेहता म्हणाले, “रुग्ण जेव्हा आजारी होतो तेव्हा उत्तम उपचार आणि करुणा यांची त्याला जास्त गरज असते. स्वयंसेवकांनी या दोन्ही गोष्टी पुरवल्या. त्यातून त्यांनी एक आदर्श उभा केला आहे. स्वयंसेवकांचा ध्यास आणि कारुण्य यामुळे रुग्णांनाही मानसिक आधार मिळाला.”
या प्रसंगी भाविसाचे अध्यक्ष किशोर शशीतल म्हणाले, की हे पुस्तक वाचून इतरांनासुद्धा या सेवाकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी यांनी पुस्तकाचा परिचय आणि सहभागी संस्थांच्या कार्याचा परिचय करून दिला. श्री. कुलकर्णी म्हणाले, “कार्यकर्त्यांचे अनुभव समाजासमोर पोचवावे आणि समाजातील इतर घटकांनीही त्यात सहभागी व्हावे, हा या पुस्तकाचा उद्देश आहे. भविष्यात अशा प्रकारच्या कामासाठी रोल मॉडेल ठरेल, असे हे कार्य आहे.”
श्री. शिंगणापूरकर म्हणाले, “समाजाने समाजासाठी केलेले काम आणि समाजाने समाजासाठी चालवलेले सहयोग केंद्र असे समर्थ भारत पुनर्बांधणी योजनेचे स्वरूप आहे. या निमित्ताने अनेक संस्था जोडल्या गेल्या आहेत.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अमृता खाकुर्डीकर यांनी केले व आभार देविदास देशपांडे यांनी मानले. याप्रसंगी भारतीय विचार साधनेचे विवेक जोशी, मिडिया विद्या स्टुडिओचे संचालक अजिंक्य कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते मनोज पोचट ई. मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सदर ‘सामर्थ्य सेवेचे’ हे ई-पुस्तक वाचकांसाठी भारतीय विचार साधनाच्या www.bhavisa.org या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहे.