छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : मराठी भाषा लिखाणातून नाही, तर बोलीतून निर्माण झाली आहे. आपली बोलीभाषा हेच समाजाचे बलस्थान आहे. त्यामुळे आपण बोलणारी भाषा जोडणारी हवी, तोडणारी नको. कारण या भाषेची पायाभरणी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांनी केली आहे, असे मत 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनातात झाल्यानंतर डॉ. भवाळकर बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष शरद पवार, डॉ. रवींद्र शोभणे, प्रा. उषा तांबे, उज्ज्वला मेहेंदळे, संजय नहार उपस्थित होते.
डॉ. भवाळकर म्हणाल्या, भाषा ही जैविक गोष्ट आहे, ती समाजात बोलली गेली तरच ती जिवंत राहते. अन्यथा ती मृत होते. ज्या दिवशी आईने आपल्या बाळासाठी पहिली ओवी म्हटली असेल, त्या दिवशी भाषा उदयाला आली. महाराष्ट्रातील संतांनी मराठी भाषेची पायाभरणी केली. त्यांनीच भाषा वाढविली आहे, तशीच चालविली देखील आहे. त्यामुळेच संतांची अभिजात भाषा आज थाटात उभी असल्याचेही डॉ. भवाळकर यांनी नमूद केले.
विठ्ठल हा महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. हे कुलदैवत मराठी माणसासारखे साधे आहे. त्याचा रंग सावळा आहे. विठ्ठलाचे भक्त सर्वत्र आहेत. ते कोणत्याही शाळेत गेलेले नाहीत, मात्र मातृभाषेचे वाहक आहेत. त्यामुळेच विठ्ठल सर्वांनाच पदराखाली घेतो, मायेची सावली देतो. महाराष्ट्रातील संत पुरोगामी आहेत. काही वेळा या शब्दाचा उपहास केला जातो. मात्र विचार हा पुरोगामीच आहे. आजपर्यंत खूप कमी महिला संमेलनाध्यक्ष झाल्या; मात्र ज्या महिलांनी हे पद भूषविले त्यांनी महिला म्हणून नाही, तर गुणवत्तेवर हा टप्पा गाठला असल्याचेही डॉ. भवाळकर यांनी स्पष्ट केले.