पुणे- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी न लागल्याने ते नाराज आहेत. त्यातच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेक तर्क वितर्क वर्तविले जात आहेत. याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, माझी भेट झाल्यानंतर भुजबळ साहेबांनी तुम्हाला सर्व सांगितले आहे. त्यामुळे आमची काय चर्चा झाली हे पुन्हा एकदा सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाही.
भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे नेते आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहेच. आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे. महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे आणि स्वतः अजितदादा देखील त्यांची चिंता करतात.
मुळातच भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे. भुजबळ साहेबांचे मत जरा वेगळं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीने त्यांना मार्ग काढला जाईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.