
पुणे(प्रतिनिधी)– माझ्याकडे देशाचे अल्पसंख्याक मंत्रालयाचे कामकाज आहे. काँग्रेस काळात या मंत्रालयास खूप बदनाम करण्यात आले. केवळ मुस्लिम मंत्रालय असे त्याला दाखवले गेले. पण आमचे मंत्रालय सहा धर्मियांसाठी काम करत आहे. मी ठिकठिकाणी जाऊन खरी परिस्थिती मांडून दुरुस्ती करत आहे. काँग्रेसने मुस्लिमांना व्होट बँक म्हणून पाहिले. त्यामुळे ते अल्पसंख्याक मंत्रालय हे मुस्लिम मंत्रालय असल्याचे दाखवण्याचे प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रीजिजू यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
याबाबत बोलताना रीजिजू म्हणाले, महाराष्ट्रामध्ये मी दौरा करत आहे. कारण महाराष्ट्र वीरांची भूमी असून त्यातून देशाला प्रेरणा मिळते. राज्याला देशातील राजकारणात सध्या बदनाम करण्यात आले असून विरोधकांकडून दिशाभूल करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी अपप्रचार करतात, की भारतात लोकशाही संपुष्टात आली आहे. अल्पसंख्याकांची गळचेपी होत आहे. परदेशात जाऊन देशाला बदनाम करण्याचे काम विरोधक करत आहेत.
महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिह्यात संविधान भवन उभारणार
संविधान धोक्यात आहे, असे सांगून खोटा प्रचार करणाऱयांनी संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गोष्टी हटविण्याचे काम आत्तापर्यंत केले आहे. संविधान नष्ट करण्याचे काम त्यांनी केले. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान यात्रा, संविधान दिवस, संविधान पूजन सुरू केले. सबका साथ, सबका विकास यादृष्टीने आम्ही देशाचा विकास करत आहोत. सन 2047 मधील विकसित भारत यादृष्टीने काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिह्यात संविधान भवन निर्माण करण्याचे आम्ही ठरवले असल्याचेही त्यांनी सांगितले.











