पुणे- “हाती घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की” अशा हजारों विद्यार्थ्यांकडून देण्यात येणाऱ्या घोषणा, कृष्ण-राधेचे सुंदर रुप घेतलेली विद्यार्थ्यांची जोडी, बहारदार नृत्यांचा अविष्कार अशा उत्साहवर्धक वातावरणात एमआयटी एडीटी विद्यापीठात यंदाचा कृष्णजन्माष्टमी व दहीहंडी उत्सव पार पडला.
एमआयटी स्कुल ऑफ मॅनेजमेंटच्या(मिटकॉम) विद्यार्थ्यांकडून चोख नियोजन करण्यात आलेल्या या उत्सवाची सुरवात विश्वरुप देवता मंदीरामध्ये बाळ श्रीकृष्णाची आरती करून कण्यात आली. या उत्सवासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डॉ.सुनिता कराड, प्र.कुलगुरू डॉ.रामचंद्र पुजेरी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.महेश चोपडे, डॉ.अतुल पाटील, डॉ. सुराज भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
विश्वशांती प्रार्थनेने उत्सवाची सुरवात केल्यानंतर यावेळी बाळ श्रीकृष्णाला झोकाही देण्यात आला. त्यानंतर करण्यात आलेल्या मंत्र्योच्चार व आरतीने विद्यापिठाचे वातावरण प्रफुल्लीत झाले होते. उत्सवासाठी विश्वरुप मंदीरात आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली होती. कृष्णजन्माष्ठमी उत्सवानंतर लगेचच मंदीराच्या प्रांगणामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपारिक नृत्यासह बॉलवूडमधील गाण्यांवर बहारदार नृत्याविष्कार करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विद्यार्थ्यांनी तीन मजली मनोरा रचत दहीहंडी फोडल्यानंतर या उत्सवाचा समारोप करण्यात आला.