पुणे(प्रतिनिधि)- जाती पातीवरून महाराष्ट्रात जे काही आता चालू आहे, ते दुर्दैवी आहे. फक्त मतांसाठी आणि राजकारणासाठी जातीपातींमध्ये विष कालवून मने दूषित केली जात आहे. हे महाराष्ट्रासाठी चांगले लक्ष नाही. राजकारण्यांनी याबद्दल विचार करावा, अशी खंत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. दरम्यान, मणिपूर सारखा हिंसाचार महाराष्ट्रातही पाहायला मिळतोय की काय ? याची चिंता वाटत असल्याच्या शरद पवार यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी “शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर होण्यास हातभार लाऊ नये,” असा खोचक टोला लगावला.
राज ठाकरे पुणे दौर्यावर असून त्यांनी सोमवारी पक्ष कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटला आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नवी मुंबई येथे “मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला, त्याच पद्धतीचा हिंसाचार आजूबाजूच्या राज्यासह महाराष्ट्रातही घडतो की काय, अशी चिंता वाटायला लागल्या,” चे वक्तव्य केले होते. या संदर्भातील प्रश्नावर राज ठाकरे यांनी पवारांना टोला लगावला.
जाती पातीवरून महाराष्ट्रात जे काही आता चालू आहे, ते दुर्दैवी आहे. फक्त मतांसाठी आणि राजकारणासाठी जातीपातींमध्ये विष कालवून मने दूषित केली जात आहे. हे महाराष्ट्रासाठी चांगले लक्ष नाही. राजकारण्यांनी याबद्दल विचार करावा, अशी खंतही ठाकरे यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री पुण्यातील असताना त्यांनी लक्ष द्यायला नको का?
पुणे शहरातील पूर परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, शहरामध्ये नगर रचना (टाऊन प्लॅनिंग) अजिबात झालेली नाही. पुण्यात पाच पाच शहर झाली आहेत. नदीत अनधिकृत बांधकाम झाल्याने पूर परिस्थिती ओढावली. अचानक पाणी सोडल्याने अनेकांच्या संसार उध्वस्त झाले आहेत. याला सर्वस्वी प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार आहे. पुण्यातील नगरसेवकांनी यात जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचे आहे. ज्यांची इच्छा आहे, त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे. एखादा प्रकल्प आणायचा असेल तर सर्वांशी चर्चा का केली जात नाही? आपापसातले हेवेदावे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसले तर हा प्रश्न सुटेल. एकट्या पक्षाच काम नाही. दोन उपमुख्यमंत्री आहेत, एक तर पुण्यातीलच आहे. ते या ठिकाणी नसतानाही धरणात पूर आला. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? असा प्रश्नही राज ठाकरेंनी यावेळी केला.
गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार महापालिकेच्या निवडणुका घेत नाही. इथे नगरसेवक नाही. निवडणुका लागतील तेव्हा आमदारांबद्दल ठरवलं जाईल. त्यामुळे ही जबाबदारी घेणार कोण, प्रशासनाशी बोलायचं कोणी, हा सर्व प्रशासकीय कारभार चालू असताना याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे प्रशासनाने यांना धीर द्यायला हवा, असेही राज ठाकरे म्हणाले.
विधानसभेत पुन्हा परप्रांतीयाचा मुद्दा ?
राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत भाजपशी जवळीक साधली होती. त्यांनी लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार नसतानाही भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. या काळात त्यांनी परप्रांतीयांच्या मुद्द्याला हात घातला नाही. मात्र, आता विधानसभेच्या निवडणुकीत स्वतंत्र उतरण्याची घोषणा केल्यानंतर ते आत्ता पुन्हा परप्रांतीयांच्या मुद्द्याकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. “बाहेरून येणार्यांना झोपडपट्टी पुर्नवसनाच्या नावाखाली घरे दिली जात आहेत. मात्र, मराठी माणसाला वार्यावर सोडले जात आहेत. याला सरकार चालवणे म्हणतात का ?” असा सवाल उपस्थित करत विधानसभेच्या प्रचाराची चुणूक दाखवली आहे.
प्रत्येकजण आपापल्या राज्याचा विचार करतोय. आपल्या राज्याचा कोणी विचार करणार आहे की नाही? झोपु योजनेत बाहेरच्या राज्यातून बदाबदा लोकं येऊन फुकट घरे घेऊन जात आहेत. कष्टाचे पैसे घालून जे लोकं जमीन, घरे घेतायत ते वाऱ्यावर पडलेत जे या राज्याचे मालक आहेत. मुंबईला गेल्यानंतर एक बैठक घेईन त्यात पुढील निर्णय घेईन, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.