पुणे(प्रतिनिधि)- स्व. मोहनलाल खाबिया माझे सहकारी होते. अनेक वर्षे त्यांनी समाजासाठी कार्य केले. दुर्दैवाने ते आपल्यातून निघून गेले. लक्ष्मीकांत खाबिया यांनी वडिलांची सेमाजसेवा करण्याची वृत्ती आजही सातत्याने पुढे चालू ठेवली आहे. पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध भागात जाऊन ते अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. समाजकार्य करीत असताना त्यांनी पत्रकार संघाची आठवण ठेवली त्यांचे मी अभिनंदन करतो आणि पत्रकार संघाने खाबिया यांना संधी दिली याबद्दल पत्रकार संघाचे आभार व्यक्त करतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वास्तूमध्ये पत्रकार स्व. मोहनलाल खाबिया यांच्या स्मरणार्थ सर्व सोयींनी सुसज्ज असा ‘रत्नमोहन’ क्रोमा स्टुडिओ उभारण्यात आला आहे. याचे उद्घाटन आज शरदचंद्र पवार यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्या वेळी त्यांनी स्व. मोहनलाल खाबिया यांच्या आठवणींना उजाळा दिला. वर्धमान, लक्ष्मीकांत आणि निलेश खाबिया यांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून स्टुडिओची निर्मिती करण्यात आली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, कार्यवाह राजेंद्र बडे व्यासपीठावर होते. या प्रसंगी अंकुश काकडे, आमदार अशोक पवार, राजेश सांकला, सुहास खाबिया, विजय दुगड, डॉ. निलिमा गोठी, सुभाष बेदमुथा, वैभव खाबिया यांच्यासह खाबिया परिवार उपस्थित होता.
यावेळी बोलताना लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, वडिल शिरूर भागात पत्रकारिता करीत असत. तसेच पत्रकार संघाचे उपाध्यक्षही होते. वडिलांच्या स्मरणार्थ पत्रकार संघासाठी काही तरी करण्याचा मानस होता तो या उपक्रमातून पूर्ण झाला आहे. स्टुडिओसाठी भविष्यकाळात लागणाऱ्या सुविधाही नक्कीच उपलब्ध करून देऊ.
पत्रकार संघाच्या वतीने खाबिया कुटुंबियांचा पांडुरंग सांडभोर यांनी सत्कार केला.