जागतिक हवामान बदलांवर उपाययोजना राबविण्यात भारत अग्रेसर – अमिताभ कांत

जागतिक हवामान बदलांवर उपाययोजना राबविण्यात भारत अग्रेसर
जागतिक हवामान बदलांवर उपाययोजना राबविण्यात भारत अग्रेसर

पुणे : तापमानवाढ व हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर केवळ चर्चा न करता भारताने परवडणारी, शाश्वत आणि सुरक्षितता उर्जा सुरक्षा निर्माण करण्यावर गेल्या काही वर्षांत भर दिला.  याबरोबरच इतर उपाययोजना राबविण्यामध्ये भारत अग्रेसर असल्याचे प्रतिपादन जी २० शेर्पा आणि नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केले.

पुण्यातील जे पी श्रॉफ फाउंडेशनच्या ‘स्पीक सस्टेनिबिलिटी’ या व्याख्यानमालेच्या उद्घाटनपर कार्यक्रमात कांत बोलत होते. अंकिता आणि प्रणती श्रॉफ यांच्या ‘सस्टेन अँड सेव्ह’ उपक्रमाच्या सहकार्याने रॉयल कॅनॉट बोट क्लब या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उद्योजक संजय किर्लोस्कर, प्रदीप भार्गवा, रवी पंडित, गणेश नटराजन, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त शेखर सिंह व जे. पी. श्रॉफ आदी मान्यवर उपस्थित होते.

सध्या देशात अनेक योजना राबविण्यात येत आहेत यामध्ये सौभाग्य योजने अंतर्गत ३ कोटी घरांना वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. उज्वला योजनेत १०० दशलक्ष कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले तर उजाला या योजनेच्या माध्यमातून ३६७ दशलक्ष एलईडी बल्बचे वितरण  करण्यात आले. त्यामुळे आपण तब्बल ४७ अब्ज किलो व्हॅट उर्जेची बचत करू शकलो आहोत. सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेसला देण्यात आलेले प्राधान्य हा या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग असून खऱ्या अर्थाने भारत तापमान वाढ आणि हवामान बदल या प्रश्नांवर काम करत आहे, याकडे कांत यांनी लक्ष वेधले.

अधिक वाचा  महापुरुषांच्या इतिहासाला जातीच्या चौकटीत बंदिस्त करणे चुकीचे- श्रीपाल सबनीस

२०२३ हे वर्ष मागील १७३ वर्षांमधील सर्वांत उष्ण वर्ष होते २०२४ देखील असेच उष्ण वर्ष असून ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे असे सांगत अमिताभ कांत म्हणाले, “तापमान वाढीचा फटका बसणाऱ्या जगातील देशांमध्ये भारत हा ७ व्या क्रमांकावर आहे. इतकेच नव्हे तर हवेच्या गुणवत्तेचा विचार केल्यास जगभरातील खराब गुणवत्ता असलेल्या ५० शहरांपैकी ४२ शहरे ही भारतातील आहेत. आज आपण १८० अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या किंमतीचे जीवाश्म इंधन दरवर्षी आयात करतो.  याचा वापर स्टील, सिमेंट, वाहतुक, रिफायनरी, खते आदी क्षेत्रांमध्ये होतो. आता पंतप्रधानांच्या धेय्यानुसार २०४७ पर्यंत जीवाश्म इंधनाचे आयातदार राहण्यापेक्षा आपण हरित उर्जेचे निर्माते व निर्यातदार होण्याचा दृष्टीने प्रयत्नशील रहायला हवे.”

सौर ऊर्जा ही मानव वापरत असलेल्या उर्जेचा सर्वाधिक मोठा स्त्रोत असून ज्याप्रमाणे भारताने आपला आकर, संख्या व क्षमतेच्या जोरावर सौरउर्जेची किंमत २४ रुपये प्रती युनिट वरून १.९९ रुपया प्रति युनिट इतकी कमी करण्यात यश मिळवले. त्याचप्रमाणे आता ग्रीन हायड्रोजनची किंमत प्रति किलोग्रॅम ४.५ अमेरिकी डॉलर वरून १ डॉलर प्रति किलोग्रॅम करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. हवामानदृष्ट्या विचार केल्यास इतर देशांपेक्षा आपण संपन्न आहोत. ग्रीन हायड्रोजनचे जगातील सर्वात मोठे निर्माते होण्याची दृष्टीने भारत पाऊले  टाकत असल्याचे कांत यांनी नमूद केले. हवामान बदलाप्रमाणे ‘फ्युचर रेडी’ होण्याकरीता आपले ‘बिझिनेस मॉडेल’ आपण आता बदलले पाहिजे. हवामान संक्रमण ही आपल्या सर्वांसाठी एक व्यावसायिक संधी असल्याचे कांत यांनी अधोरेखित केले.

अधिक वाचा  मोहोळांची प्रचारात आघाडी : विविध क्षेत्रातून मिळतोय उत्स्फूर्त पाठींबा

नजीकचा भविष्यात जागतिक प्रशासनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचे भारताचे उद्दिष्ट असून २०४७ पर्यंत हवामान कृतीसह आर्थिक वाढीचा समतोल राखणे आपल्यासाठी गरजेचे आहे असे सांगत कांत म्हणाले, “भारताने कार्बनीकरण न करता औद्योगिक विकासावर भर दिला पाहिजे. यासाठी आवश्यक योजनांची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण ठरू शकेल. परवडणारी, शाश्वत आणि सुरक्षितता उर्जा सुरक्षा या गोष्टींवर आपण भर द्यायला हवा आहे. रिस्कीलिंग आणि अपस्कीलिंग यांचे महत्त्व लक्षात घेत भारताने उद्योग परिसंस्था उभारण्यावर लक्ष द्यायला हवे आहे. नेट झिरो उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर डिजिटल आणि हरित अर्थव्यवस्थेची कास आपल्याला धरावी लागणार आहे.”

आजवर आपण नवीन शहरी विकास योजनेअंतर्गत ६ शहरांसाठी डीझेल बसेस टाळत ५५०० इलेक्ट्रिक बसेसची खरेदी पूर्ण केली असून आता ५७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आपण आणखी १० हजार इलेक्ट्रिक बसेस घेत आहोत. याद्वारे भारत हा जागतिक पातळीवर प्रमुख इलेक्ट्रिक बस निर्माता म्हणून पुढे येऊ शकेल. वायू व सौर उर्जा आणि इलेक्ट्रिक वाहने या क्षेत्रात नोकरीच्या तब्बल ३.४ दशलक्ष इतक्या संधी येत्या काळात उपलब्ध होतील अशी माहिती अमिताभ कांत यांनी यावेळी दिली.

अधिक वाचा  maratha kranti morcha मराठा क्रांती मोर्चा :चार प्रमुख पक्षांच्या कार्यालयावर आक्रोश आंदोलन Outrage movement

अमिताभ कांत यांनी आपल्या भाषणात बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय उद्योगांसाठी काही महत्वाचे मुद्दे मांडले. यामध्ये वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला प्राधान्य देणे, वायू व सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन आदी भविष्यवेधी संधींची उपलब्धता बघता हरित नोकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करणे, हरित परिसंस्था निर्माण करणे या विषयांचा समावेश होता. २०५० पर्यंत भारतातील शेतमालाची मागणी ५० टक्क्यांनी वाढेल असे अनुमान आहे. परंतु त्याच जोडीला हवामान बदलामुळे शेतीचे उत्पन्न हे ३० टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज आहे. त्यामुळे आधुनिकीकरणाची कास धरत शेतीतील शाश्वत गुंतवणूक वाढविण्यावर भर द्यायला हवा, असे कांत यांनी आवर्जून नमूद केले.

‘सस्टेन अँड सेव्ह’ उपक्रमाच्या अंतर्गत यावेळी ‘सस्टेनेबल लाईफस्टाईल टिप्स’ या पुस्तिकेचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच कार्यक्रमात ‘अर्थशास्त्र आणि शाश्वतता’ याविषयावर चर्चासत्र संपन्न झाले यामध्ये केपीआयटीचे अध्यक्ष रवी पंडित, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, किर्लोस्कर ब्रदर्स या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर आणि एमसीसीआयए इलेक्ट्रोनिक क्लस्टर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ गणेश नटराजन यांनी चर्चासत्राचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. जे पी श्रॉफ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अंकिता श्रॉफ सारडा यांनी सूत्रसंचालन केले.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love