धबधब्यातून वाहून गेलेल्या पाचही जणांचे मृतदेह शोधण्यात यश : पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्यांची गय नाही – जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा  

Succeeded in finding the bodies of all the five people who were washed away from the falls
Succeeded in finding the bodies of all the five people who were washed away from the falls

पुणे(प्रतिनिधि)–भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्यातून वाहून गेलेल्या पाच जणांचे मृतदेह शोधण्यात अखेर रेस्क्यू पथकाला यश आले आहे. दरम्यान, पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून यापूर्वीच सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत. स्थानिक प्रशासनदेखील सूचना देत असते. मात्र, अनेक वेळा पर्यटक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे काल घडलेल्या घटनेप्रमाणे घटना घडतात, असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. 

भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्यातून एक महिला व चार मुले असे पाच पर्यटक रविवारी (३०  जून) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या प्रवाहासोबत भुशी धरणात वाहून गेल्याची घटना घडली होती. पुण्यातील हडपसर येथील काही पर्यटक लोणावळय़ात फिरायला आले होते. यापैकी ९ जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, त्यापैकी चार जण बाहेर निघाले. तर शाहिस्ता लियाकत अन्सारी (वय ३५), अमिमा अदील अन्सारी (वय १३) तिची बहीण हुमेदा अदील अन्सारी (वय ८), मारिया अकिल सय्यद (वय ९) व अदनान सबाहत अन्सारी (वय ४) हे पाच जण वाहून धरणात गेले. यापैकी शाहिस्ता, अमीमा व हुमेदा यांचे मृतदेह रविवारी पाण्यातून बाहेर काढण्यात आले होते. मारिया हीचा मृतदेह सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आला, तर अदनान या चार वर्षाच्या मुलाचा शोध दिवसभर सुरू होता. सायंकाळी ५.३०  वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले. लोणावळय़ातील शिवदुर्ग मित्र व आयएनएस शिवाजी ही शोध पथके रविवारपासून धरणात शोध मोहीम राबवत होते.

अधिक वाचा  लाइफ स्किल्स कोलॅबोरेटिव्ह भारतातील पहिला जीवन कौशल्य शब्दकोष मराठीत सुरू

याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी दिवसे म्हणाले, काल लोणावळय़ात घडलेली घटना दुदैवी आहे. पर्यटकांच्या अती उत्साहामुळे अशा घटना घडतात. त्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करता येतील. मात्र, पर्यटकांनीदेखील येथे आल्यानंतर स्वतः काही बंधने घालून घेणे गरजेचे आहे. पर्यटकांना पर्यटनस्थळांची माहिती नसताना विनाकारण निर्जनस्थळी जाण्याचा प्रयत्न केला जातो. सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते, पर्यटन करताना सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे. जबाबदारीने व सुरक्षितपणे पर्यटन केल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात. लोणावळय़ातील पाऊस, धुके व निसर्ग याचा आनंद घेण्यासाठी पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते नो व्हेईकल झोन करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. 

 निसर्गाचा आनंद घेताना जीविताची काळजी घ्या 

लोणावळय़ात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी येथे अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवार, शनिवार व रविवारी याचे काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. याकरिता पोलीस यंत्रणेसोबत, रस्ते विकास महामंडळ, आयआरबी व महामार्ग पोलीस यांना सूचना दिल्या आहेत. लोणावळय़ात येण्यासाठी अनेक मार्ग असल्याने वाहतूक कोंडीची समस्या जास्त आहे. मोठय़ा बसेसलादेखील ठराविक अंतरापर्यंत प्रवेश दिला जाईल. मात्र, त्यांना पर्यटनस्थळांकडे जाण्यास बंदी असेल, असे त्यांनी सांगितले.  निसर्गाचा आनंद घेताना आपल्या जीविताची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. याकरिता फिरायला जाताना प्रत्येकाने स्वतःला काही बंधने घालून घेणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. 

अधिक वाचा  ऑनलाईन नोकरीच्या शोधात असलेल्यांची कशी होते फसवणूक?:'ट्रॅप्ड' लघुपटाद्वारे जनजागृती

 व्हायरल व्हिडिओने चुकवला काळजाचा ठोका

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ रविवारी रात्री व्हायरल झाला. हा व्हिडिओ सर्वदूर पसरला. त्यातील संबंधित कुटुंबीय वाहून गेल्याचा प्रसंग अंगावर काटा आणणारा होता. अन्सारी कुटुंबीयांतील लहान मुले वाहून जातानाच्या दृश्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love