पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल थ्री) बारमधील झालेल्या बेकायदा ड्रग्ज पार्टीत अमली पदार्थ सेवन करणाऱ्या पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले. दोन तरुणांनी बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
अपघात प्रकरणात एल थ्री बारचा जागामालक, व्यवस्थापकांसह आठ जणांना अटक करण्यात आली. बारमध्ये बेकायदा पार्टीचे आयोजन आरोपी अक्षय कामठे याने केले होते. पार्टीसाठी ऑनलाइन, तसेच रोख स्वरुपात शुल्क स्वीकारण्यात आले होते. समाजमाध्यमात कामठे याने पार्टीची जाहीरात प्रसारित केली होती. पार्टीत सामील झालेल्या ४० ते ४५ जणांची पोलिसांनी चाैकशी केली. पोलिसांनी आठ आरोपींपैकी तिघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. पार्टीत सामील झालेल्या काहीजणांचे रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रक्त तपासणीचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. पार्टीत सामील झालेल्या दोन तरुणांची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन तरुणांविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.