पुणे(प्रतिनिधि)—पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित केलेल्या प्रचार फेरीत केंद्रीय मंत्री रामदास जी आठवले यांनी सहभाग घेतला. आमदार सुनील भाऊ कांबळे, मंगला मंत्री, उमेश गायकवाड, हिमाली कांबळे, सुशांत निगडे, संदीप लडकत, सनी मेमाणे जयप्रकाश पुरोहित उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात चांगले काम केले. त्यामुळे पुणेकरांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आत्मीयता आहे. कोरोना नंतर त्यांनी विकास कामांना गती दिली. त्याबरोबर शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. पुणे महापालिकेतील शिवाजी महाराजांचे स्मारक, महापालिकेत पहिल्यांदा स्थापन केलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा, माता रमाईचे स्मारक, फुले दांपत्याची
समता भूमी, लहुजी वस्ताद साळवे यांचे समाधी स्मारक ही काही उदाहरणे आहेत. सर्व समग घटकांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता अशी मोहोळ यांची प्रतिमा आहे, पुणेकरांनी त्यांना विक्रमी मताधिक्क्याने विजयी करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.
कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही
संविधान धोक्यात असल्याचे बिनबुडाचे आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्यात येत असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आठवले पुण्यात आले असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इंडि आघाडीकडुन संविधान बदलाची उलटसुलट चर्चा केली जात आहे. लोकशाही धोक्यात आली आहे असा प्रचार सुरु आहे. लोकशाही जर धोक्यात आली असती तर पंतप्रधान मोदी मत मागण्यासाठी देशभर फिरले असते का? संविधानावर देश चालणार आहे. विरोधकांनी कितीही बाता मारल्या तरी संविधानाप्रमाणेच देशाला चालवावे लागेल. देश म्हटला की,संविधानाची भुमिका, गीता, कुराण बायबल असे अनेक धर्माचे ग्रंथ आहेत. याचा आदर सर्वांना आहे. संविधानाने आपआपल्या धर्मा प्रमाणे चालण्याची परवानगी दिली आहे. देश म्हटला की, संविधान आणि या देशात त्यालाच राहण्याचा अधिकार आहे ज्याला बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान मान्य आहे. ज्यांना संविधान मान्य नसेल त्यांना आपण जसा इंग्रजांना चले जावचा नारा दिला होता. तशाच पध्दतीने ज्यांना संविधान मान्य नसणार्यांना चले जाव अशी आमची भुमिका राहणार असल्याचे आठवले म्हणाले.
देशभरामध्ये एनडीएचे वातावरण आहे. त्यामुळे चारशे पेक्षा जास्त जागा एनडीएच्या निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. त्यादृष्टीने आमची वाटचाल सुरु आहे. राज्य आणि देशभरातील मोदींच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. एससी,एसटी आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याची भुमिका मांडली जात आहे.त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, आमच्या महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त जागा निवडूण येतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुहाटीला गेल्यानंतर शिंदे यांना मुख्यमंत्री करतो अशी ऑफर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली होती. मात्र त्यांना अगोदर मुख्यमंत्री केले असते तर ही वेळ आली नसती. आदित्यला मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न ठाकरेंचा होता. महाराष्ट्राच्या विकासाचा आणि राजकारणाचा खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाविकास आघाडीचा आम्हाला खात्मा करायचा आहे. पुण्यातील चारही जागा निवडून येतील. त्याचबरोबर मुंबईच्या सर्व सहा जागा निवडूण येतील असा आम्हाला विश्वास आहे असे आठवले म्हणाले.