पुणे- “ज्या दिवशी बाळ जन्माला येते, त्या दिवशी आई जन्माला येते आणि एक स्त्री पुनर्जन्म घेते. बाळाचा जन्म आणि आईचा जन्म या एकमेकांमध्ये गुंफलेल्या अशा दोन समांतर घटना आहेत. हे आपण आवर्जून मान्य केले पाहिजे अस मत ‘बर्थ ऑफ अ मदर : रि-बर्थ ऑफ अ वुमन’ या पुस्तकाच्या लेखिका जीवन प्रशिक्षक (लाइफ कोच) शलाका तांबे यांनी व्यक्त केले.
महिला दिनाचे औचित्य साधून जीवन प्रशिक्षक (लाइफ कोच) शलाका तांबे यांच्या ‘बर्थ ऑफ अ मदर : रि-बर्थ ऑफ अ वुमन’ या पुस्तकाचे अनावरण सकाळ माध्यम समूहाच्या कार्यकारी संपादिका शीतल पवार यांच्या हस्ते पुण्यातील ऑर्किड हॉटेलच्या ग्रँड चेंबर्स हॉलमध्ये झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.
तांबे यांच्या पुस्तकात मातृत्वाच्या कथेची व्याख्या नव्याने करण्यात आली असून नऊ महिन्यांच्या या कायापालट करणाऱ्या अनुभवाच्या भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक आयामांतून महिलांना मार्गदर्शन केले आहे. या पुस्तकात करुणा, काळजी आणि आत्मविश्वास यावर भर देण्यात आली आहे आणि हे पुस्तक व्यावहारिक साधने आणि अंतर्दृष्टी प्रदान करते जेणेकरून स्त्रियांना मातृत्वाच्या प्रवासात सक्षम करता येईल.
शलाका तांबे म्हणाल्या, “ज्या दिवशी बाळ जन्माला येते, त्या दिवशी आई जन्माला येते आणि एक स्त्री पुनर्जन्म घेते. बाळाचा जन्म आणि आईचा जन्म या एकमेकांमध्ये गुंफलेल्या अशा दोन समांतर घटना आहेत. हे आपण आवर्जून मान्य केले पाहिजे. आयुष्य बदलणाऱ्या या घटनेवर लक्ष केंद्रित करणे आणि स्त्रीची आई म्हणून सहज भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक उत्क्रांती होण्यासाठी जाणीवपूर्वक काय करणे आवश्यक आहे हे समजून घेणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.”
“नऊ महिन्यांच्या गरोदरपणात आपल्या मनात व शरीरात घडणाऱ्या बदलांसाठी नवीन माता अनेक वेळा तयार नसतात. या पुस्तकामुळे त्यांना प्रत्येक छोट्या बदलाची शारीरिक व भावनिकदृष्ट्या जाणीव होण्यास मदत होते. बाळाला जन्म दिल्यावर एक स्त्री म्हणून पुनर्जन्माच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना हा प्रवास सकारात्मकतेने स्वीकारायला त्यांना शिकवले जाते. महिलांना कायापालट करणाऱ्या मातृत्वाच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शलाकाच्या मौल्यवान अंतर्दृष्टी असलेल्या या पुस्तकाचे अनावरण करताना मला आनंद होत आहे”, असे शीतल पवार म्हणाल्या.
या कार्यक्रमात शलाका तांबे आणि पुस्तकातील रेखाचित्रे रेखाटणारे यतीन मोघे यांनी पुस्तकामागील प्रेरणा सांगितली आणि त्यातील प्रमुख विषयसूत्र आणि संदेश जाणून घेतले. यावेळी डॉ सुनीता ललवाणी आणि डॉ पारस दैठणकर यांनी परिसंवादातून पुस्तक आणि महिलांचे मानसिक आरोग्य मांडले. यावेळी पुस्तकाचे प्रकाशक इन्स्पयार ग्रुपचे संजय कुलकर्णी आणि शमा मोघे, पुष्कर तुळजापूरकर आणि इतर मान्यवर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात मातृत्व व महिलांच्या भावनिक आरोग्याविषयी आपापल्या दृष्टिकोनाची सखोल माहिती मिळाली. सूत्रसंचालन वासवी मुळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शलाका तांबे यांच्या पुस्तकावर स्वाक्षरी करण्याच्या सत्राने झाली.