पुणे–डेटिंग साठी मुलगी मिळवून देण्याचे आमिश दाखवून ७९ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीची तब्बल १७ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. या ज्येष्ठ व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर स्त्रिया नामक तरुणी विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेबर २०२१ पासून २९ जून २०२२ दरम्यान घडला आहे.
प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी व्यक्ती हे एका बँकेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात ते कुटुंबासह राहतात. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी मुलीचा फोन आला होता. तिने त्यांना डेटिंग साठी मुली पुरवण्याचं आमिष दाखवले. या जेष्ठ नागरिकानेही काही मुलींचे फोटो मागून घेतले. संबंधित मुलीने या ज्येष्ठ नागरिकाला काही मुलींचे फोटो पाठवले आणि डेटिंग वर जायचे असल्यास आधी काही पैसे भरावे लागतील असे सांगितले.
सुरुवातीला या ज्येष्ठ नागरिकाला फोन पेद्वारे पैसे भरण्यास भाग पाडले. आणि त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यावर तब्बल १७ लाख रुपये भरण्यास भाग पाडले. दरवेळी या व्यक्तीला मुलगी देतो देतो असे सांगून आणखी पैसे मागितले जात होते. मात्र अनेक महिन्यानंतरही डेटिंग साठी मुलगी मिळत नाही आणि पैसे मात्र जातात असे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली.
तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर वारजे माळवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.