पुणे(प्रतिनिधि)-राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने उद्या शुक्रवार (दि. २६) रोजी आयोजित इयत्ता दहावी व बारावीचे पुरवणी परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ विषयाचा पेपर आता दि. ३१ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत होईल. तर बारावीचे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. भाग २ या विषयांचे पेपर दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत होणार आहेत.
राज्य मंडळाकडून दरवर्षी इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा आयोजित केली जाते. यंदाची दहावीची पुरवणी परीक्षा दि. १६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत तर बारावीची पुरवणी परीक्षा दि. १६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येत आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मागील दोन-तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. या पावसाचा फटका पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन दि. २६ जुलै रोजी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. दहावीचे पेपर दि. ३१ जुलैला तर बारावीचे पेपर दि. ९ ऑगस्टला होणार आहेत. उर्वरित पेपर नियोजित वेळापत्रकानूसार होतील, अशी माहिती मंडळाच्या सचिव मेधा निरफराके यांनी दिली.