राजस्थानमध्ये राजकीय उलथापालथ सुरु असताना आमदार खरेदी घोटाळ्याच्या व्यवहारासंदर्भात समोर आलेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा आवाज ओळखला गेला असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. जयपूरमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते अजय माकन म्हणाले, ‘ एफआयआरमध्ये गजेंद्रसिंग शेखावत यांचे नाव आले आहे आणि ऑडिओ टेपमध्ये त्यांचा आवाज ओळखला गेला आहे, तर ते केंद्रीय मंत्रीपदावर अद्याप कसे? त्यांनी एकतर त्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना मंत्रीपदावरून काढून टाकावे जेणेकरून या प्रकरणाच्या तपासावर ते प्रभाव पाडू शकणार नाहीत.
ते पुढे म्हणाले, गजेंद्र सिंह शेखावत म्हणत आहेत की ऑडिओमधील आवाज हा त्यांचा नाही तर दुसर्या एखाद्या गजेंद्रसिंगचा आहे. जर असे असेल तर त्यांनी त्यांच्या आवाजाचा नमुना देणे आवश्यक आहे आणि तपास पूर्ण होईपर्यंत मंत्रीपदावरून बाजूला गेले पाहिजे. राजस्थान पोलिसांना भंवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंग यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी भाजप शासित राज्यातील पोलिस का देत नाहीत? असा सवालही माकन यांनी केला आहे.
आमदार खेळताय अंताक्षरी
सचिन पायलट यांच्या गटात जाण्यापासून रोखण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जयपूरच्या फेअरमोंट हॉटेलमध्ये आमदारांना ठेवले आहे. दरम्यान, हॉटेलमधला आमदारांचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये सर्व आमदार एकत्र बसून अंताक्षरी खेळत असल्याचे दिसते आहे.
कॉंग्रेसने संजय जैन यांच्यावर गंभीर आरोप केले
राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) भाजपचे आमदार संजय जैन यांना अटक केली आहे. कॉंग्रेसचे आमदार राजेंद्र गुडा त्यांच्याबद्दल म्हणाले, संजय जैन आठ महिन्यांपूर्वी माझ्याकडे आले होते. त्यांनी मला वसुंधराजी आणि इतरांना भेटायला सांगितले होते. त्यांच्यासारख्या इतर अनेक एजंट्स आहेत पण त्यांच्या प्रयत्नात ते यशस्वी झाले नाही. आमची संख्या 100 पेक्षा जास्त (आमदार) आहे. आमच्याकडे बहुमत आहे. आमच्याकडे बहुमत नसते तर त्यांनी (भाजप) शक्ती प्रदर्शनाची मागणी केली असती. त्यांना माहित आहे की आमच्याकडे बहुमत आहे, म्हणून ते ‘फ्लोअर टेस्ट’ची मागणी करीत नाहीयेत.
फोन टॅपिंगवर भाजपने केला प्रश्न उपस्थित
दरम्यान, फोन टॅपिंग संदर्भात विरोधी पक्षनेते जीसी कटारिया म्हणाले, ‘फोन टॅप करण्याचा अधिकार सरकारकडे आहे, परंतु गृह विभागाकडून मान्यता घेतल्यानंतर हे केले जाऊ शकते. कोणत्याही खाजगी व्यक्तीस हे करण्याचा अधिकार नाही. जे लोकेश शर्मा ज्यांना सीएमडींचा ओएसडी म्हटले जात आहे, त्यांनी हा प्रकार केला आहे. त्यांना हा अधिकार नसून त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. भाजपाने कधीही फ्लोर टेस्टची मागणी केली नव्हती आणि आताही केलेली नाही. आम्ही त्यांच्यातील लढाई पाहतो आहोत. जेव्हा आम्हाला काहीतरी करावे लागेल अशी वेळ येईल तेव्हा आम्ही चर्चा करू आणि तसे पावूल टाकू. आम्हाला या प्रकरणात अनावश्यकपणे खेचले जात आहे असा आरोपही त्यांनी केला.