पुणे-नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगानी सजून साजरे करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांत रुजली असतानाच, या आनंदोत्सवात अनेकजण आपापल्यापरीने वैविध्य आणण्याचा प्रयत करीत असतात. या काळात देवीच्या भक्तीची अनेक रुपेही पहायला मिळतात. यावर्षीचा नवरात्रौत्सव कोरोनाच्या छायेखाली घरबसल्याच साजरा होत असतांनाच लोकांनी कोरोनाशी लढतांना भक्तीबरोबरच शारीरिक शक्तीलाही महत्त्व दिले आहे. लोकांना या नऊ दिवसांत नऊ रंगांचा घरांत राहूनच सुरक्षितरित्या एका वेगळ्या प्रकारे आनंद घेता यावा व देवीच्या भक्तीलाही वेगळा साज देता यावा, या भावनेतून ‘किसान कनेक्ट’ या ऑनलाईन पद्धतीने ‘शेतातून थेट दारी’ या संकल्पनेतून भाजीपाला व फळे पुरवठा करणार्ऱ्या मंचातील शेतकरी बंधूंनी उत्सवाच्या नऊ दिवसांसाठी विविध प्रकारच्या नऊ रंगांच्या फळांचे नैवेद्य व प्रसादासाठीचे अनोखे बास्केट्स आपल्या फळबागांतून उपलब्ध केले आहेत.
या नवरंग बास्केट्समध्पे पोषक, प्रतिकारशक्ती वाढविणारी ताजी व काळजीपूर्वक हाताळणी केलेली नऊ रंगांची फळे आकर्षकरित्या मांडली असून त्यायोगे देवीभक्तांना नवरात्रीसाठी बाजारात न जाता घरबसल्या फळे घेता येतील. किसान कनेक्टने यांत नऊ रंगांची वुडन सफरचंद, संत्री, सफेद ड्रॅगन फ्रुट, जर्द लाल रंगाची सफरचंदे, ब्ल्युबेरी, केळी, हिरवी किवीज्, जांभळ्या रंगाचे प्लम्स आणि हिरवी सफरचंदे यांच्या बास्केट्स तयार केल्या आहेत. या फळांबरोबरच देवीभक्तांना उपवासाचे रताळी, साबुदाणा, भगर, बटाटे आदी गोष्टीही उपलब्ध होतील. याद्वारे, लोकांना भक्तीबरोबरच पोषक फळांचा आहारही करता यावा व कोरोना काळात आपल्या तब्येतीचीही काळजी घेता यावी, ही यामागील कल्पना आहे. याखेरीज, हे शेतकरी प्रतिकारशक्ती वाढविणारे ‘ईम्यूनिटी बास्केट्स’ही पुरवित आहेत.
संपूर्ण लाॅकडाऊनच्या काळात ‘किसान कनेक्ट’च्या दोन हजारहून अधिक शेतकरी बंधूंनी मुंबई, ठाणे व पुणे येथे आपल्या शेतातून थेट लोकांच्या दारी ताजा, पोषक व दर्जेदार भाजीपाला व फळे सातत्याने, सुरक्षितरीत्या पोहोचविला असून, अनेक लोकांनी बास्केट्समधून उपलब्ध झालेल्या या शेतमालाला पसंती दर्शवली आहे. किसान कनेक्ट’चे शेतकरी ॲपच्या व ग्राहक कक्षाच्या माध्यमातून नोंदणी घेत असून लाॅकडाऊनंतर शेतकरी बंधूंनी स्वतःहून व स्वतःच्या बांधवांसाठी सुरू केलेला संपूर्ण देशातील पहिला मोठा मंच आहे. अहमदनगर व पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी किसान कनेक्ट या शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत आपापल्या शेतातून ताजा माल थेट ग्राहकांना स्वतंत्र व सुरक्षित वाहनांतून पोहचवितात. या शेतकरी बंधूंनी भाजीपाला व फळांचे आजवर सुमारे पावणे दोन लाख खोके विकले असून, हे शेतकरी भारत सरकारच्या अन्न सुरक्षा प्रमाणित मंडळाने (एफ्.एस्.एस्.एस.ए.आय्) घोषित केलेल्या ‘ईट राईट ईंडिया’ या सुरक्षित अन्न सेवनाच्या मोहीमेस पाठिंबा देत आहेत.