पुणे(प्रतीनिधि)–अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची खोली आणि दिव्यदृष्टीचा अंदाज केवळ त्यांचे साहित्याचे वरवर वाचन करुन आपल्याला येणार नाही. अण्णाभाऊ आपल्यालाला पचवावे लागतील, रिचवावे लागतील तेव्हाच त्यांचा विचार आपणा पर्यंत पोहचेल असे सांगतानाच अण्णाभाऊंना लोकशाहिर ही उपाधी लावण्याआधी मी त्यांना स्वातंत्र्यसैनिक ही उपाधी लावणे अधिक संयुक्तिक मानतो. असे ,उद्गार लोककलाकार आणि पार्श्वगायक नंदेश उमप यांनी व्यक्त केले.
अण्णाभाऊंनी त्यांच्या पोवाड्यांमधून डफलीवर थाप मारुन संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत क्रांतीचे जे रणशिंग फुंकले त्याला तोड नाही, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दि सांगता समारंभानिमित्त आज संवाद पुणे आणि समर्थ युवा फौंऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार्श्वगायक नंदेश उमप यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन सन्मनित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी उपमहापौर सरस्वती शेडगे, संवाद पुणेचे सुनील महाजन, एनवायसीएमचे चेअरमन आणि समर्थ युवा फौंऊडेशन अध्यक्ष राजेश पांडे, सचिन ईटकर, निकिता मोघे आणि पुणे विद्यापीठाच्या आण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ.सुनील भणगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळ्या नंतर प्रसिद्ध संवादक मिलींद कुलकर्णी यांनी पार्श्वगायक नंदेश उमप यांचा लोककलेतील प्रवास गप्पांमधून उलगडून दाखविला.
नंदेश उमप त्यांच्या प्रकट मुलाखतीत विविध प्रश्नांची उत्तर देताना म्हणाले की, अण्णाभाऊंनी विपूल साहित्य निर्मितीद्वारे त्यावेळी समाजाला दिशादर्शनाचेच काम केले. आजही माझ्या सारख्या कलाकाराला अण्णाभाऊंचे पोवाडे सादर करतांना रोमांचीत व्हायला होते, ही त्यांच्या शब्दांचीच ताकद म्हणावी लागेल. अण्णाभाऊंच्या विचारांची खोली आणि दिव्यदृष्टीचा अंदाज केवळ त्यांचे साहित्याचे वरवर वाचन करुन आपल्याला येणार नाही.
अण्णाभाऊ आपल्यालाला पचवावे लागतील, रिचवावे लागतील तेव्हाच त्यांचा विचार आपणा पर्यंत पोहचेल. माझे बाबा विठ्ठल उमप आणि अण्णा यांच्यातील मैत्रीतील गोफ मी खूप जवळून अनुभवले आहेत. बाबांना एखाद्यावेळेस आण्णांच्या भेटीला जाणे न जमल्यास नायगांव पर्यंत बाबांच्या भेटीला अण्णा चालत यायचे.
कार्यक्रम आयोजनामागची भूमिका संवाद पुणेचे सुनिल महाजन यांनी विशद केली, तर समर्थ युवा फौंऊडेशनचे राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पुणे मनपाचे अध्यक्ष हेमंत रासने, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सचिन ईटकर आदी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.