सुशांतच्या चाहत्यांची सीबीआय चौकशीसाठी मोहीम
मुंबई— अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी सोशल मीडियावर एक मोहीम सुरु केली आहे. सिनेमा आणि राजकारणातील अनेक सेलिब्रिटींनीही सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अनिल देशमुख म्हणाले की, सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची गरज नाही. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम आहेत. सीबीआय चौकशीची मागणी मान्य करण्यात आलेली नाही.
देशमुख म्हणाले की, ‘मलाही सोशल मिडीयावरील या मोहिमेचे अनेक ट्वीट्स आले आहेत. परंतु मला सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची आवश्यकता वाटत नाही. मुंबई पोलिस या प्रकरणाचा योग्य तपास करून चढा लावतील. मुंबई पोलिस सर्व मार्गाने या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपास पूर्ण होताच, त्याच्या अंतिम अहवालाची तपशीलवार माहिती एकत्रित केली जाईल
यापूर्वी बिहारचे माजी खासदार पप्पू यादव, अभिनेते शेखर सुमन, रूपा गांगुली आणि भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्तींनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरील सुशांतचे चाहते देखील सीबीआय चौकशीसाठी सरकारकडे विनंती करत आहेत.
दरम्यान, गुरुवारी सुशांतसिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांनी गृहमंत्री अमित शहा यांना आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून टॅग करून मदत मागितली. रिया चक्रवर्ती हिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आदरणीय अमित शाह सर, मी रिया चक्रवर्ती, सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण आहे. सुशांतच्या मृत्यूला एक महिना उलटून गेला आहे. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे, तथापि न्यायाच्या हितासाठी, मी तुम्हाला विनंती करते की या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. सुशांतला हे पाऊल उचलण्यासाठी कोणी दबाव आणला हे मला फक्त जाणून घ्यायचे आहे. …रिया चक्रवर्ती.