मुंबई(ऑनलाईन टीम)—आज रक्षाबंधन भाऊ- बहिणीच्या पवित्र नात्याचा हा दिवस. भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ परिसरातील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांचे औक्षण करुन राखी बांधली. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीयउपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून आणि व्हिडीओ शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे.
पवार घराण्यातील हे दोघे बहिण-भाऊ राजकारणात आहेत. त्यामुळे कौटुंबिक नाते कितीही घट्ट असले तरी कधी कधी राजकारणातील स्पर्धा सख्या नात्यालाही दूर करते याचा अनुभव राजकारणात अनेक वेळा येतो. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या बाबतीतही अशा चर्चा घडताना दिसतात. परंतु, आमच्यातील भावा-बहिणीचे नाते घट्ट आहे, हे दोघांनीही याअगोदर सांगितले आहे.
आजही सुप्रिया सुळे यांनी अजित दादांना रक्षाबंधन करीत त्याचे फेसबुक लाइव्ह केले.
पवार कुटुंबियांमध्ये असे सण एकत्रितपणे साजरे केले जातात. दिवाळीच्या वेळी पाडवा आणि भाऊबीजेलाही अशाच प्रकारे सुप्रिया सुळे यांना औक्षण करत असतात.
दरम्यान, कोरोना काळात अनेक महिला डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा ताई, महिला पोलीस असा मोठा भगिनीवर्ग जीवाची जोखीम पत्करुन समाजातील इतर भावांच्या रक्षणासाठी लढत आहे. त्यांच्या शौर्य, त्याग, समर्पणाबद्दल आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी कृतज्ञ राहिलं पाहिजे, अशा भावना अजित पवार यांनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत.