यंदाचा पुणे फेस्टिवल रद्द


३१ वर्षांची परंपरा खंडित

पुणे(प्रतिनिधी)— पुण्यातील गणेशोत्सवाची महती सातासमुद्रापार नेणाऱ्या आणि गेली ३१ वर्षे अखंडितपाने सुरु असलेल्या ‘पुणे फेस्टिवल’लाही कोरोनाचा फटका बसला असून  दि. २१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२० या गणेशोत्सव काळामध्ये होणारा ३२ वा पुणे फेस्टिवल रद्द करण्यात आला आहे. प्रथेप्रमाणे पुणे फेस्टिवल श्रींची प्रतिष्ठापना व श्रींचे विसर्जन विधिवत करून संपन्न होईल, अशी माहिती पुणे फेस्टिवलचे चेअरमन सुरेश कलमाडी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कोरोनाच्या संकटाचे सावट पुण्यातील गणेशोत्सावर पडल्याने यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णयही पुण्यातील गणेश मंडळानी घेतला आहे.

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला. त्यापासून प्रेरणा घेऊन कला-संस्कृती, गायन-वादन, नृत्य,संगीत व क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या पुणे फेस्टिवलचे आयोजन पुणे फेस्टिवल कमिटी पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते.पुणे फेस्टिवलने पुण्याचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर नेले आहे. सलग १० दिवस आणि सातत्याने ३१ वर्षे अखंडित चालू असलेला पुणे फेस्टिवल हा देशातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो.कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले संकट लवकर संपावे, अशी श्री गणेश चरणी प्रार्थना करतो आणि पुढील वर्षी नव्या उत्साहाने, दिमाखदारपणे पुणे फेस्टिवल साजरा होईल, असा विश्वास चेअरमन सुरेश कलमाडी यांनी व्यक्त केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  डेक्कन क्वीनचा ९३ वा वाढदिवस केक कापून जल्लोषात साजरा