पुणे(प्रतिनिधी)–पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज (मंगळवारी) बदली झाली आहे. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर त्यांचे बारीक लक्ष होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज बदली झाली आहे. पुण्याहून थेट दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवल किशोर राम यांचा समावेश दोन महिन्यांपूर्वीच देशातील 50 सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत करण्यात आला होता. ‘फेम इंडिया’ आणि एशिया पोस्ट सर्व्हे’ या खासगी संस्थांनी हे सर्वेक्षण केले होते.
पुण्यात गेल्या वर्षी आलेला महापूर असो किंवा सध्या कोरोनाचे संकट असो, जिल्हाधिकारी म्हणून नवल किशोर राम यांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळल्याचे बोलले जाते.
सौरभ राव यांच्या जागी एप्रिल 2018 मध्ये नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली होती. याआधी त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ, बीड, औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.
आदेश निघाल्यापासून नवल किशोर राम यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्हाधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे. पण, एका आठवड्याच्या आतच राम दिल्लीत उपसचिव म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.