पवारांचा शिवसेनेला आणि सामनाला आताच पुळका कसा आला?-नारायण राणे


कोरोना परिस्थितीचे अपयश झाकण्यासाठी पवारांची मुलाखत

मुंबई: ‘शरद पवार हे मॉडर्न अफझलखान’, ‘महाराष्ट्राचे खरे शत्रू शरद पवारच’, ‘शरद पवार कोण? चोरांचे सरदार गुंडाचे बादशहा’, अशा सामनातील शिर्षकांनी शरद पवार यांना अनेक वेळा लक्ष्य करण्यात आले. असे असताना त्याच पवारांचा आता शिवसेनेला आणि सामनाला पुळका कसा आला?, असा सवाल भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत केला.

शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे आणि त्यांचा आदर ठेवूनच मी बोलत आहे, असे नमूद करत राणे यांनी सामना वर्तमानपत्राची जुनी अनेक कात्रणे पत्रकार परिषदेत झळकावली. सामनाच्या बातम्या असतील, अग्रलेख असतील, त्यातून नेहमीच पवारांवर टीका करण्यात आली. बाळासाहेब तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबतच संजय राऊत यांनीही अनेकदा पवारांवर टीका केली. सामनात शरद पवार यांच्याइतकी टीका आजवर कुणावरही झाली नाही. त्यामुळेच आता घेतलेली मुलाखत हे केवळ आणि केवळ राजकारण आहे. राज्यात करोना साथीचे थैमान सुरू असताना त्यावरून लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीच ही मुलाखत घेण्यात आली आहे, असा आरोपच राणे यांनी केला.

अधिक वाचा  कोणी कितीही मोठ्या बापाचा असूद्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकलं म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही- कोणाला आणि का म्हटले असे अजित पवार?

संजय राऊत यांनी ही मुलाखत ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. त्याची दुसऱ्या कुणी दखल घेतली नाही तरी शिवसैनिक मात्र नक्कीच घेणार आहेत. आधीची शिवसेना आणि आताची शिवसेना यातला फरक यानिमित्ताने शिवसैनिकांना कळून चुकला आहे. या मुलाखतीत एकप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही टीका करण्यात आली. सरकारमध्ये संवाद नसल्याचे शरद पवार बोलले. हे सगळं पाहता संजय राऊत हे नोकरी सामनाची करतात आणि काम शरद पवार यांच्यासाठी करतात हे नव्याने स्पष्ट झाले, असा टोलाही राणे यांनी लगावला.

देशात सर्वाधिक करोना रुग्ण आणि मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. असे असताना हसतखेळत मुलाखत घेणाऱ्यांची कीव करावीशी वाटते. याना जनतेचं काहीच सोयरसुतक नाही, अशी टीकाही राणे यांनी केली

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love