गीतारहस्य – निष्काम कर्मयोग

लेख
Spread the love

असंतोषाचे जनक म्हणून ओळख असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या स्मृतिशताब्दीची १ ऑगस्ट रोजी सांगता होत आहे. या निमित्ताने ‘स्मरण लोकमान्यां’चे ही खास लेखमाला वाचकांसाठी…..

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे सर्व राष्ट्रभक्त भारतीयांचे आराध्य दैवत होय. लोकमान्य हे व्यक्तित्वाने ‘गीता पुरुषोत्तम’ होते तर कर्तृत्त्वाने ‘राष्ट्र पुरुषोत्तम’ होते. आपण यापूर्वी लोकमान्यांची जन्म-शताब्दी १९५६मध्ये साजरी केली. लोकमान्यांची दीडशेवी जयंती २००६मध्ये झाली. लोकमान्यांच्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथराजाची जन्मशताब्दी २०१५मध्ये झाली. तर यावर्षी येत्या १ ऑगस्ट रोजी लोकमान्यांची स्मृतिशताब्दी सांगता आहे. त्यांच्या कार्य कर्तृत्वाला अत्यंत कृतज्ञतापूर्वक मानवंदना. 

लोकमान्यांच्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथराजाने, भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोगाचा महान सिद्धान्त अत्यंत जोमदारपणे मांडला. “संसारात भांबावून गेलेल्या मनास, निष्काम कर्माचरणाकडे प्रवृत्त करणारा भगवद्गीतेसारखा दुसरा ग्रंथ, संस्कृत भाषेतच काय पण जगातील वाङ्मयात  सापडणे दुर्मिळ होय,” असे लोकमान्यांचे स्वत:चे अभ्यासपूर्वक बनलेले मत होते आणि स्वत: लोकमान्य कसे होते? तर आपल्या भारतवर्षात पुनरपि स्वातंत्र्यसूर्याचा उदय व्हावा म्हणून आणि सर्व क्षेत्रातील परचक्राचा विनाश व्हावा म्हणून अहर्निश प्रयन करणारे होते. म्हणूनच आपणाला जाणवते की गीतोक्त निष्काम कर्मयोगाचे साक्षात आदर्श स्वत: लोकमान्यच होते. आपणाला लोकमान्यांचे आत्मचरित्र वाचायचे असेल तर, त्यांचा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ वाचावा. कारण त्यात त्यांचे जीवनसूत्रच आहे.

लोकमान्यांच्या मते भगवद्गीतेचे प्राणतत्त्व आहे ‘निष्काम कर्मयोग’. आणि ही संकल्पना आपण अधिकाधिक समजून घेऊ लागलो तर आपणासमोर या संकल्पनेची चार सूत्रे उलगडत जातात. ती म्हणजे – अफलाकांक्षी कर्मयोग, निर्लेप कर्मयोग, समष्टिधर्मी कर्मयोग आणि कर्तव्ययोगी कर्मयोग. त्यातही विशेष गोष्ट म्हणजे ही चार सूत्रे स्वत: लोकमान्य आणि त्यांचे शिष्य यांनी आपापल्या ग्रंथातून ती मांडलेली आहेत, असे लक्षात येते. 

लोकमान्य टिळकांनी आपल्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथात ‘कर्मफल त्याग’ या संकल्पनेवर अधिक भर दिला आहे. तर ज. स. करंदीकर यांनी निष्काम कर्मयोगाच्या आचरणातून मोक्षप्राप्तीही खात्रीने शक्‍य आहे. हे सांगताना, निर्लेपत्वाची महती वर्णिली आहे. सदाशिवशास्त्री भिडे यांनी, व्यष्टिधर्म आणि समष्टिधर्म यांची अनिवार्य परस्परपूरकता प्रकट करून, प्रत्येक मानव मात्राचे ‘अभ्यूदयी निःश्रेयस’ हे ध्येयच अधोरेखित केले आहे. याचप्रमाणे ग. वि. केतकर यांनी गीताधर्म हा कसा मानव धर्म आहे, हे सुस्पष्ट करताना प्रत्येक व्यक्तीकडून अपेक्षित असणारी कर्तव्य धर्माचरणाची आवश्यकता विशद केली आहे.

असे हे चार पैलू एकत्र समजून घेतले तर, लोकमान्यांची ‘निष्काम कर्मयोगी’ संकल्पना अधिक नेमकेपणाने आपल्या लक्षात येते. म्हणजेच लोकमान्य टिळक यांना सर्वथा प्रिय असणारी राष्ट्रोद्धारक आणि मानवहितकारक कर्मयोगाची संकल्पना, अधिकाधिक सुस्पष्ट होत जाते. इथे आपण सर्वप्रथम हे लक्षात  घेतले पाहिजे, की मुळात निष्काम कर्मयोग हेच खरे ‘गीतारहस्य’ आहे. याच संदर्भात आपल्या गीतारहस्य ग्रंथात आग्रहपूर्वक लोकमान्य म्हणतात, “श्रीमदभगवद्गीतेत कर्मयोग हा गौण, आणि संन्यास हा मुख्य समजणे म्हणजे यजमानास त्याच्याच घरात पाहुणा ठरवून, पाहुण्यास यजमान करण्याइतके असमंजसपणाचे आहे.” 

लोकमान्य असेही म्हणतात, की भगवद्गीतेचा मुख्य हेतू उच्च ब्रह्मज्ञान आणि निष्काम कर्मयोग यांची सांगड घालण्याचा आहे. म्हणून लोकमान्यांच्या मते, खरे ‘गीतारहस्य’ कोणते? तर, ज्ञानमूलक, भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग! यासाठीच भगवद्गीतेतील सर्व अध्यायांची नेमकी संगती सांगताना, लोकमान्य म्हणतात, भगवान श्रीकृष्णासारख्या सर्वश्रेष्ठ तत्त्वचिंतक व्यक्तीने, वीरश्रेष्ठ अर्जुनासारख्या महान धनुर्धराला, स्वकर्तव्याचरणाचा केलेला उपदेश, श्रीमद्गभगवद्गीतेत आहे. 

म्हणजे असे की, प्रत्येक मनुष्यमात्राने, आपली चित्तशुद्धी झाल्यावर सुद्धा आपापली प्राप्त कर्तव्य, निष्काम बुद्धीने करावीत असेच या एकूण

गीतोपदेशाचे मर्म आहे. या कर्तव्यप्रधान कर्मयोगाच्या जीवनपद्धतीत, कर्म सोडावयची नाहीत. पण फलाशा मात्र सोडावयाची आहे. त्यामुळे असा हा कर्मयोग, नीट विचार कैला की, तत्त्वत: संन्यासच होतो. हाच तो निष्काम कर्मयोगाचा भगवद्प्रसाद आहे – असेही लोकमान्य अगदी आवर्जून सांगतात. अशा या निष्काम कर्मयोगाचे पहिले सूत्र आहे – “अफलाकांक्षा”.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

सा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि।।

याचा अन्वय असा – ते कर्मणि एव अधिकारः। फलेदु कदाचन मा। (त्वं कर्मफलहेतु: मा भू:। ते अकर्मणि संगः मा अस्तु।

– या श्लोकाचा अर्थ सांगताना लोकमान्य म्हणतात – (हे मानव मात्रा), कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे. फल मिळणे किंवा न मिळणे हे केव्हाही तुझ्या अधिकारातील म्हणजे ताब्यातील  नाही. (म्हणूनच) माझ्या अमुक कर्माचे, अमुक फळ मिळावे, असा (हावरेपणाचा) हेतू (मनात) ठेवून तू काम करणारा होऊ नकोस आणि (त्याचबरोबर) तू कर्म न करण्याचाही आग्रह घरू नकोस!” पण कर्मांचे फल कर्माला चिकटूनच असल्यामुळे, ज्याचे

झाड त्याचे फळ या न्यायाने जो कर्म करण्यासाठी अधिकारी आहे तोच ‘फलाचाही अधिकारी झाला, अशी शंका येते. म्हणून ती दूर करण्यासाठी भगवंतांनी “फलाचे ठायी तुझा अधिकार नाही,” असे दुसऱ्या चरणामध्ये सुस्पष्ट विधान केले आहे.

निष्काम कर्म योगाचे दुसरे सूत्र निर्लेपत्व.

‘“ब्रम्हण्याध्याय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति य:।

लिप्यते न स पापेन पद्मपत्रावमिवाम्भसा।।”

याचा अन्वय असा – य: कर्मणि ब्रह्मणि आधाय संगं त्यक्‍त्वा (तानि) करोति. स: अम्भसा पद्मपत्रम्‌ इव पापेन न लिप्यते।!

म्हणजे असे की – “जो कर्मयोगी, आपली सर्व कर्मे ब्रम्हार्पण बुद्धीने करून, स्वत:ची त्या विषयीची आसक्ती टाकून देतो तो ज्याप्रमाणे पाण्याने जसे कमलपत्र लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे तो कर्मयोगी, कर्मासंबंधीच्या कोणत्याही पापाने लिप्त होत नाही”.

भारतीय जनमानसाला, आपली कर्मे करताना ‘श्रीकृष्णार्पणमस्तु’ असा संकल्प करणे पिढ्यान्‌पिढ्या प्रिय आहेच. 

निष्काम कर्मयोगाचे तिसरे सूत्र समष्टीधर्मी कर्मयोग 

“यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर ।

तत्र श्रीर्विजयो भूति ध्रुवा नीतिर्मतिमम।।

याचा अन्वय असा की, यत्र योगेश्वरः कृष्णः (तथा) यत्र धनुर्धरः पार्थः तत्र श्रीर्विजयः (इति) मम मति)।।.

याचाच अर्थ असा आहे की, अभ्युदयाचा विचार करताना व्यक्तीला प्राधान्य न देता, समाजाला द्यायला हवे. नि:श्रेयस किंवा मोक्षाच्या संदर्भात, व्यक्ती हे अधिष्ठान आहे. मात्र यापुढे जाऊन, व्यक्ती आणिं समाज यांचा संबंध परस्परानुकूल असावा लागतो. ही अन्योन्यपोषकता फार महत्त्वाची आहे. निष्काम कर्मयोगाचे चौथे सूत्र  कर्तव्ययोग. 

“यतः प्रवृत्तिर्भूतानां येत सर्वमिदं ततम्‌।

स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः।।

याचा अन्वय असा – “यतः भूतानां प्रवृत्तिः, येन च इदं सर्वं ततम्, तं स्वकर्मणा अभ्यर्च्य मानवः सिद्धिं  विन्दति।“

म्हणजे असे की, ज्याच्यापासून सर्वभूतमात्रांची, सर्व पदार्थांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व व्यापले आहे, त्या परमात्म्याची  आपल्या स्वाभाविक म्हणजे अंगभूत, गुणसमन्वित आणि समाजप्रदत्त कर्तव्यकर्मांनी मनःपूर्वक उपासना केली असता, त्या त्या मनुष्यमात्रास सर्वोच्च सिद्धी म्हणजे मोक्षप्राप्ती खचित होते – यात संशय नाही. 

म्हणजे आपण जे निष्काम बुद्धीने कर्तव्याचरण करू, तेच ईश्वराचे आराधन आहे. तेच ईश्वराचे पूजन आहे.

याच भक्तियुक्त उपासनेने, क्रमाक्रमाने गीतोक्त ‘समत्व बुद्धि योगही प्राप्त होईल. मनुष्यप्राणी खचित जीवन मुक्त  कर्मयोगी होईल अशा तऱ्हेने भगवद्गीतोक्त निष्काम कर्मयोग हा लोकमान्य टिळक यांना सर्वथा प्रिय असणारा निष्काम कर्मयोग हा  ‘अफलाकांक्षी, निर्लेप, समष्टिधर्मी आणि कर्तव्ययोगी अशा चतु:सूत्रीने परिपूर्ण झालेला आहे. लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने ‘चतुःसूत्री निष्काम कर्मयोगाचे आपण निष्ठापूर्वक आचरण करणे हीच लोकमान्यांना अर्पण केलेली सर्वोच्च आदरांजली ठरेल. त्यासाठी आपण सर्वजण निष्ठापूर्वक कटिबद्ध होऊया!

डॉ. मुकुंद दातार

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक, वक्ते आणि गीता धर्म मंडळाचे (पुणे) अध्यक्ष आहेत.

सौजन्य एकता मासिक

संपर्क -९८२२८७६०३८

( विश्व संवाद केंद्र पुणे आणि प्रांत प्रचार विभाग द्वारा प्रकाशित )

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *