पुणे-कोरोनामुळे राज्याच्या व देशाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम झाला असून, पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात केंद्राकडे मदतीची मागणी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे दिली. कोरोनाविषयक उपाययोजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात टास्क फोर्स बनविण्यात येणार असून, 1 सप्टेंबरनंतरही व्हेंटिलेटर व अन्य सुविधांचा पुरवठा करण्याची विनंती पंतप्रधान महोदयांकडे करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली. या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, सुरुवातीच्या टप्प्यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत होती. मात्र, तेथे तातडीने टास्कफोर्स स्थापन केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आता राज्याच्या अन्य भागांतही मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील कोरोनाच्या संसर्गाची पहिली लाट संपलेली नाही. आणखी किती लाटा येतील, हे आजच सांगता येणार नाही. म्हणूनच अन्यत्रही टास्क फोर्सचे निर्माण करण्यात येत आहे.
राज्यात व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गरजेनुसार त्या-त्या भागात पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकांना कोरोना प्रतिबंधच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्यात आली असून, यापुढेही मदत देण्यात येईल. व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्कचा पुरवठा 1 सप्टेंबरनंतरही केंद्राकडून करण्यात यावा, अशी विनंती प्रधानमंत्री महोदयांना केली आहे. सर्व लोकप्रतिनिधींनीदेखील आपापल्या स्तरावर याबाबत विनंती करावी. जेणेकरून राज्याला याचा लाभ होईल. कोरोना रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. तथापि, प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सर्व महापालिकांनी बेडचे नियोजन करावे
तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बऱयाचदा रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येत आहे, असे होवू नये यासाठी खासगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असणाऱया रुग्णांना परस्पर तपासणी अहवाल न देता संबंधित महापालिका यंत्रणेला द्यावा, जेणेकरून रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होईल, असे नमूद करीत पुण्यात वाढत्या रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टीने बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे. यामध्ये महानगरपालिकेने पुढाकार घ्यायला हवा. पुण्यासह अन्य महानगरपालिकांनीही बेडची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी. यासाठी राज्य शासन महापालिकांना आर्थिक मदत निश्चित देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोरोना ही राज्यावरील आपत्ती
कोरोना ही राज्यावर आलेली आपत्ती आहे. लॉकडाऊनला विरोध झाला, पण लॉकडाऊनच्या कालावधीचा उपयोग आरोग्य सुविधा वाढवून घेण्यासाठी होतो. या सुविधा म्हणजे केवळ बेड वाढविणे नाही. तर अन्य स्वरूपाच्याही आहेत. कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आज प्रथमच स्वतः वाहन चालवत पुण्यात आले होते.