अफवा असल्याचं बच्चन यांनी केले ट्वीट
मुंबई- बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कोरोनाच्या टेस्टचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तसेच माध्यमांमध्येही याबाबतचे वृत्त देण्यात आले आहे. मात्र, ही माहिती खोटी, बेजबाबदार आणि अफवा असल्याचं
स्वत: अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.
22 जुलै रोजी अमिताभ बच्चन यांनी स्वॅब टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट आला असल्याचे नानावटी रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले होते. साथीच्या रोगाच्या नियमांमुळे अमिताभ बच्चन याबाबत स्वत: याला दुजोरा देऊ शकत नाही. अमिताभ यांच्या आणखी दोन टेस्ट होतील. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सलग तीन टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल अशा प्रकारचे वृत्त सोशल मिडीया आणि काही प्रसार माध्यमांमध्ये देण्यात आले होते. मात्र, बच्चन यांनी याला बेजबाबदार आणि अफवा असल्याचे म्हटले आहे.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही अमिताभ सोशल मीडियावर चाहत्यांच्या सतत संपर्कात आहेत. बुधवारी त्यांनी ट्वीटरवर आपल्या एका फोटसह ‘खामोशी की तह में छुपा लो सारी उलझनों को, शोर कभी मुश्किलों को आसान नहीं करता।’ ..असे लिहिले आहे.
जेव्हापासून अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले तेव्हापासून त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. दि. 11 जुलै रोजी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. फक्त बच्चन कुटुंबातील जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. अमिताभ बच्चन यांच्या 26 कर्मचार्यांचीही कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. त्या सर्वांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले होते.