नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—राज्यसभेचे खासदार आणि आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांचे शनिवारी निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते. याच वर्षी त्यांचे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती . शनिवारी दुपारी त्यांचे निधन झाले.
अमर सिंह यांच्या राजकीय कारकिर्दीला १९९६ मध्ये सुरुवात झाली होती. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांची निवड झाली होती. सध्या ते उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर होते. २०१० साली त्यांनी वाद झाल्यानंतर समाजवादी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांची राजकीय सक्रीयता थोडी कमी झाली होती. आजारी पडण्यापूर्वी ते भाजपच्या अतिशय जवळही आले होते.
किडनीच्या व्याधीने त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून ग्रासले होते. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांच्या एकेकाळी अत्यंत निकटचे व मित्रत्वाचे त्यांचे संबंध होते. अभिनेते अमिताभ बच्चन यांचेही ते मित्र होते, काही काळानंतर त्यांच्या संबंधामध्ये दुरावा आणि कटुता निर्माण झाली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात अमर सिंह यांनी ‘आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे आणि याच निमित्तानं मला अमिताभ बच्चन यांच्याकडून एक मॅसेज मिळाला. आज आयुष्याच्या या वळणावर जेव्हा मी जीवन आणि मृत्यूचा सामना करत आहे, मी अमितजी आणि त्यांच्या कुटुंबाकडे आपल्या टिप्पणीसाठी माफी मागतो. ईश्वर त्यांचं भलं करो’ असं ट्विट अमर सिंह यांनी केलं होतं.
सिंगापूरमध्ये उपचार सुरु असतनाच मार्च महिन्यात त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. परंतु त्यावेळी अमर सिंह यांचा ‘टायगर अभी जिंदा है’ हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. सिंगापूरमधून मी अमर सिंह बोलतोय. ‘आजाराने त्रस्त आहे. पण घाबरलेलो नाही. हिंमत अजून बाकी आहे, जोशी बाकी आहे आणि होशही बाकी आहे. माझ्या काही शुभचिंतकांनी आणि मित्रांनी अफवा पसरवलीय. यमराजने मला बोलावल्याची. असं काही झालेलं नाही. माझ्यावर उपचार सुरू आहेत’, असं अमर सिंह यांनी या व्हिडिओत म्हटलं होतं.